नेटफ्लिक्सवरील पळपुट्या उद्योजकांच्या वेबसीरीजवर मेहुल चोक्सीचा आक्षेप, कोर्टात धाव

नेटफ्लिक्सने नुकतीच बॅड बॉय बिलिनियर्स या डॉक्युमेंट्री वेबसीरीजचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या सीरीजमध्ये नीरव मोदी,  विजय माल्ल्या यांचे प्रामुख्याने चित्रण आहे. ही सीरीज प्रदर्शनापूर्वीच वादात सापडली आहे. मेहुल चोक्सी यांनी या वेबसीरीजवर आक्षेप घेत कोर्टात धाव घेतली आहे. तसेच प्रदर्शनापूर्वी या सीरीजची स्क्रीनींग व्हावी अशी मागणीही चोक्सी यांनी केली आहे.

गीतांजली जेम्स या ज्वेलर्स कंपनीकडून मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी यांनी साडे १३ हजार कोटींचा घोटाळा केला आहे. गेल्या वर्षी मेहुल चोक्सी देश सोडून फरार झाला होता. 2 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सची ही सीरीज प्रदर्शित होणार आहे. हिंदुस्थानातील जे जे मोठे उद्योगपती होते ज्यांनी घोटाळे केले आणि परदेशात पळून गेले त्यांच्यावर आधारित ही सीरीज आहे. त्यात विजय माल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी, सहाराचे सुब्रतो रॉय तसेच राजु रामलिंग यांचे प्रामुख्याने चित्रण केले आहे.

मेहुल चोक्सी यांनी या सीरीजवर आक्षेप नोंदवला आहे आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ही सीरीज प्रदर्शित करण्यापूर्वी आपल्याला दाखवावी अशी मागणी चोक्सी यांनी केली आहे. कोर्टानेही नेटफ्लिक्सला या सीरीजची चोक्सीसाठी प्रीस्क्रीनिंग करता येईल यावर विचार करण्यास सांगितले आहे. तसेच याबाबत पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.

मेहुल चोक्सींनी जरी या सीरीजवर आक्षेप नोंदवला असला तरी संपूर्ण सीरीजमध्ये चोक्सीवर फक्त २ मिनिटांचा सीन आहे. पण ही सीरीज प्रदर्शित होऊ नये अशी मागणी चोक्सीच्या वकीलांनी केली आहे. या सीरीजचा ट्रेलर रीलीज झाल्यानंतर चोक्सींना जगभरातून फोन येत असल्याचे चोक्सीच्या वकीलांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या