मेहूल चोक्सीचा आणखी एक घोटाळा उघड; पीएसबीला 44 कोटींचा चुना

982

13 हजार कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्सी फरार आहे. चोक्सीला देशात आणण्यासाठी तपास यंत्रणांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी मेहूल चोक्सीचा आणखी एक घोटाळा उघड झाला आहे. मेहूल चोक्सीने पंजाब अॅण्ड सिंध या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेला 44.1 कोटींचा चुना लावला आहे. याबाबतची माहिती बँकेने दिली आहे. पहिल्यांदाच एका बँकेने चोक्सीच्या घोटाळ्याची माहिती उघड केली आहे.

पंजाब अॅण्ड सिंध बँकेकडून (पीएसबी) मेहूल चोक्सीच्या गीतांजली जेम्स लिमिटेडने कर्ज घेतले होते. त्याने कर्जाची परतफेड केली नसल्याने 31 मार्च 2018 रोजी बँकेने त्याचे खाते नॉन परफॉर्मिंग एसेट (एनपीए) घोषित केले. मेहूल चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याची मागणी सीबीआयने केली आहे. मुंबईतील एका न्यायालयात सीबीआयने याबाबत मागणी केली आहे. पीएनबी घोटाळ्यात चोक्सीविरोधात जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटला त्याने उत्तर दिलेले नाही. तसेच या प्रकरणी आरोपपत्र दाखल होण्याआधीच त्याने देश सोडला आहे. त्यामुळे त्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करावे अशी मागणी सीबीआयने केली आहे.

मेहूल चोक्सी सध्या अँटिग्वामध्ये आहे. प्रकृती अस्वास्थाचे कारण देत त्याने हिंदुस्थानात परतण्यास नकार दिला आहे. हिंदुस्थानी तपास यंत्रणा अँटिग्वामध्ये येऊन चोक्सीची चौकशी करू शकतात, असे अँटिग्वाचे पंतप्रधान गैस्टन ब्राऊन यांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्याचे अँटिग्वाचे नागरिकत्व रद्द करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या