चोक्सीला इंटरपोलच्या यादीतून वगळले, देशात ‘मोदानी मॉडेल’ कार्यरत; राहुल गांधी यांची टोलेबाजी

देशात ‘मोदानी मॉडेल’ असल्याचा खोचक टोला लगावतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल यांनी ट्विट करताना फरारी मेहुल चोक्सी याला इंटरपोलच्या यादीतून वगळल्याच्या बातमीचाही संदर्भ दिला आहे.

राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. मेहुल चोक्सीला इंटरपोलच्या वॉण्टेड यादीतून वगळण्यात आले असून जगात कुठेही आता तो फिरू शकतो, अशा आशयाच्या बातमीचा संदर्भ राहुल गांधी यांनी दिला आहे. यावरून विरोधकांच्या मागे ईडी-सीबीआयची चौकशी लावली जाते, मात्र मित्रांची सुटका केली जाते. हे मोदानी मॉडेल असून याचा अर्थ आधी लुटा आणि त्यानंतर कोणतीही शिक्षा झाल्याशिवाय त्या प्रकरणातून मुक्त व्हा, असे राहुल यांनी म्हटले आहे.

मेहुल चोक्सीची रेड कॉर्नर नोटीस रद्द
इंटरपोलने मेहुल चोक्सीविरोधात ‘रेड कॉर्नर’ नोटीस जारी केली होती. हिंदुस्थानातून फरारी झाल्यानंतर तब्बल 10 महिन्यांनंतर ही नोटीस जारी करण्यात आली होती. त्याच वर्षी चोक्सीने अँटिग्वा तसेच बारबुडाचे नागरिकत्व स्वीकारले होते. मेहुल चोक्सीने या रेड कॉर्नर नोटिसीला आव्हान दिले होते आणि ते प्रकरण राजकीय षड्यंत्र असल्याचा दावा केला होता. मेहुल चोक्सीने आपल्या याचिकेत हिंदुस्थानातील तुरुंगातील परिस्थिती, त्याची वैयक्तिक सुरक्षा आणि आरोग्य यासारखे मुद्दे मांडले होते. चोक्सीच्या याचिकेनंतर हे प्रकरण पाच सदस्यीय इंटरपोल समितीच्या कोर्टात गेले. सुनावणीनंतर या समितीने रेड कॉर्नर नोटीस रद्द केल्याचे सांगितले जात आहे.