ते शतक माझ्यासाठी खास आणि संघासाठी आवश्यक होतं, अजिंक्य रहाणेचा खुलासा

ऑस्ट्रेलियामध्ये नुकतीच झालेली चार कसोटी सामन्यांची मालिका टीम इंडियाला जिंकून देणाऱ्या अजिंक्य रहाणेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये रहाणेने नवख्या खेळाडूंची मोट बांधत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. विराटच्या अनुपस्थितीमध्ये रहाणेने कर्णदारपदाचा भार सांभाळत मेलबर्नमध्ये शतकी खेळी केली आणि संघाला मालिकेत पुनरागमन करून दिले.

मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटीत अजिंक्य रहाणे याने 112 धावांची खेळी केली. हा सामना टीम इंडियाने जिंकला आणि मालिकेत पुनरागमन केले. आता ही मालिका संपल्यानंतर रहाणेने ते शतक खास होते असा खुलासा केला आहे. ‘स्पोर्टस टुडे’शी बोलताना त्याने बॉक्सिंग डे कसोटीतील शतक खास होते असे म्हटले आहे.

‘कसोटी सामना आणि मालिका जिंकणे माझ्या वैयक्तीक यशाहून मोठे आहे. परंतु मेलबर्नमध्ये ठोकलेले शतक माझ्यासाठी खास आहे. बॉक्सिंग डे कसोटीमध्ये शतक झळकावल्यानंतर मी लॉर्डसवर 2014 मध्ये केलेली 103 धावांची शतकी खेळी खास होती असे म्हटले होते. परंतु अनेकांनी मला तुझी मेलबर्नमधील खेळी आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी होती असे सांगितले’, असे रहाणे म्हणाला. तसेच अॅडलेडमध्ये दारूण पराभवानंतर जे वातावरण तयार झाले होते ते निवळण्यासाठी शतकाची आणि विजयाची गरज होती. तिथे शतक ठोकल्यानंतर मला खूप आनंद झाला होता, असेही रहाणे म्हणाला.

8 विकेट्सने विजय आणि मालिकेत पुनरागमन

अॅडलेडमध्ये 36 धावांमध्ये खुर्दा उडाल्यानंतर टीम इंडियाने बॉक्सिंग डे कसोटी 8 विकेट्सने जिंकली आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या कसोटीच्या पहिल्या डावात अजिंक्य रहाणे याने 112 धावांची शतकी खेळी केली होती. यानंतर सिडनी कसोटी अनिर्णित राखत आणि ब्रिस्बेन कसोटी जिंकत टीम इंडियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर कब्जा केला.

HappyBirthdayPujara – टीम इंडियाची नवी ‘वॉल’, जाणून घ्या पुजाराबाबात खास गोष्टी

बॉक्सिंग डे कसोटीत 2 शतक ठोकणारा पहिला खेळाडू

रहाणेने मेलबर्नच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत दोन शतक ठोकले आहेत. 2014 मध्ये देखील त्याने येथे शतक ठोकले होते. टीम इंडियाकडून अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू आहे. याआधी विरेंद्र सेहवाग याने 2003 तर विराट कोहलीने 2014 ला मेलबर्नमध्ये झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीत शतक केले होते, तर पुजाराने 2018 ला अशी कामगिरी केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या