मेळघाटातील अंश्रद्धेचा पुन्हा बळी, अखेर ‘त्या’ बालकाचा मृत्यू

आजारी पडल्यानंतर 2 वर्षीय बाळाला दवाखान्यात न नेता त्याच्या पोटाला चटके दिल्याची घटना मेळघाटात घडली. त्या बालकाचे काल रात्री अमरावतीच्या दवाखान्यात निधन झाले. दरम्यान पोटावर चटके देणा-या मुलाच्या आजीविरोधात चिखलदरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजरत्न जमूनकार असे मृत बाळाचे नाव आहे.

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील खटकाली येथील दोन वर्षीय बाळ आजारी पडले होते. त्याला रुग्णालयात नेण्या ऐवजी त्याच्या आजीने त्याला भूमका बाबाकडे नेले व त्या मांत्रिकाच्या सांगण्यावरून आजीने त्या बाळाच्या कानाला चटका दिला. मात्र तरिही बाळाला बरे न वाटल्याने पुन्हा बाबाच्या सांगण्यावरून आजीने त्याच्या पोटाला गरम विळ्याचे चटके दिले होते.

ही संतापजनक घटना घडल्यानंतर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी गंभीर दखल घेत रुग्णालयात जाऊन पाहणी केली होती. शिवाय चटके देणा-या आजी विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र चार दिवसानंतरही बाळाच्या प्रकृतीमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. अखेर काल रात्री (शनिवार) त्या बाळाचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या