स्मरण रामदास दुर्घटनेचे

259

>> रवीन्द्र माहिमकर

रामदास बोट रेवसजवळ वादळात बुडाली या दुर्घटनेला 17 जुलै रोजी 72 वर्षे पूर्ण झाली. या अपघातात 700 प्रवासी बुडाले व 150 वाचले. या दुर्दैवी घटनेमुळे मुंबई व कुलाबा जिल्ह्यात तेव्हा मोठा हाहाकार उडाला होता. या दुर्घटनेचे विस्मरण अशक्यच आहे.

माझ्या लहानपणी पेण एस. टी. स्टॅण्डवर एक अंध गायक रामदास बोटीच्या अपघाताचा पोवाडा गाऊन असे व पैसे मागत असे. त्या पोवाडय़ात ‘रामदास’ दुर्घटनेची पूर्ण माहिती असे. आज त्या दुर्घटनेला 72 वर्षे झाली. रामदास बोट बुडाली त्या भीषण घटनेने मोठा हाहाकार उडाला होता. त्यात 700 जीव प्राणास मुकले होते. कुलाबा जिह्यातील व मुंबईतील लोक या घटनेने शोकसागरात बुडाले होते.

17 जुलै 1947, गुरुवार त्या दिवशी अमावास्या होती. दिवस पावसाळ्याचे, पण त्या दिवशी सकाळी पावसाची काही चिन्हे नव्हती. साधे वारेही वाहत नव्हते. मुंबई ते गोवा ही या पॅसेंजर स्टीमर बोटीची नेहमीची ये-जा; पण आठवडय़ातून एक दिवस मुंबई ते रेवस-धरमतर अशी परतीची फेरी ‘रामदास’ करत असे. त्यावेळी कुलाबा (रायगड) मधील सर्व नोकरदार मंडळी या बोटीनेच आपल्या ‘स्वीट होम’कडे धाव घेत असत. हा जवळचा मार्ग व वेळेची बचत होई. अन् तो काळदिवस उजाडला. भल्यासकाळी प्रवासी सामानासह भाऊच्या धक्क्यावर हजर होत होते. समवयस्क गप्पागोष्टीत, थट्टामस्करीत मशगूल होते. त्या दिवशी ‘गटारी’ होती. सर्वांनाच बोटीत जास्त गर्दी वाटत होती. काही तासांनी आपल्या जीवनाची अखेर आहे, नियतीचा क्रूर डाव आहे, आपल्या आयुष्याचा हा शेवटचा प्रवास आहे हे त्या दुर्दैवी जीवांना माहीत नव्हते. हवामान खात्याने त्या दिवशी कोणतीही धोक्याची सूचना दिली नव्हती किंवा बंदरात वादळाच्या इशाऱयाचे निशाण फडकत नव्हते. सकाळी आठ वाजता रामदास बोटीने भोंगा दिला. घंटा वाजली. मृत्युघंटाच ती…… धक्क्यावरून अखेरचे (?) निरोप दिले-घेतले जात होते. पाच मिनिटांनी ‘रामदास’ भाऊच्या धक्क्यापासून विलग झाली, मात्र बोट किनाऱयाला अंतरली ती कायमचीच!
रामदास पाण्यात हळूहळू मार्ग आक्रमू लागली. साडेसातशे प्रवासी व कर्मचारी घेऊन बोटीचे अनुभवी कप्तान शेख सुलेमान इब्राहीम आपली डय़ुटी बजावत होते. बोट धक्का सोडून 20-25 मिनिटे झाली होती. आकाशात काळे ढग जमून पाऊसही सुरू झाला. बुचर बेट, एलिफंटा आता दिसेनासे झाले.

करंजाजवळचे दीपगृह मागे पडले. नंतर पावसाबरोबर वारेही वाहू लागले. मुख्य समुद्राच्या मुखाचा भाग मागे पडला. थोडे पुढे डावीकडे धरमतरची (अंबा नदी) खाडी सुरू होते. पण क्षणात वाऱयाचा जोर अचानक वाढला. बोट जास्त हेलकावू लागली. लाटांचे पाणी लावलेल्या जाड किंतानावर सपकारे मारू लागले. प्रवासी घाबरले होते. पाच-दहा मिनिटांत हवामानाचा नूर भयानक झाला. बोटीच्या उजव्या बाजूला होणाऱया लाटांच्या माऱयामुळे पडदे फाटले. लाटांच्या सपकाऱयाचे पाणी बोटीत येऊ लागले. बोटीवर हाहाकार माजला. सर्व आकांताने ओरडू व पळू लागले.

मुसळधार पाऊस व वादळाचा जोर कायम होता. मोठय़ा लाटा उसळत होत्या. त्यातील एका लाटेने दगा दिला. त्या मोठय़ा लाटेचे पाणी उजव्या बाजूने बोटीत शिरले. बोट उजव्या बाजूला थोडी कलंडली. प्रवाशांच्या किंकाळ्यांनी बोटीवर हलकल्लोळ माजला. उजव्या बाजूने पाणी बोटीत आले म्हणून सगळे प्रवासी घाबरून बोटीच्या डाव्या बाजूला धावले. वादळी वारा व मोठय़ा लाटांचे भयाण तांडवनृत्य सतत चालू होते. कप्तान सुलेमानला व त्याच्या सहकाऱयांना काय करावे हे कळेना इतके हे भयनाटय़ अनपेक्षित घडले होते. सर्व प्रवासी एका बाजूला गेले. त्याचबरोबर खूपसे सामानही घसरत गेले. अधिक बोटीत आलेले पाणी हे सर्वच डाव्या बाजूला गेल्यामुळे बोटीची समतोलता पूर्णपणे ढळली.

अमावास्या-पौर्णिमेला भरतीचे पाणी जास्त वाढते हा निसर्गनियम. कॅ. सुलेमान त्याचा चीफ-ऑफिसर आदमभाईबरोबर काळजीग्रस्त होता. प्रवाशांना वाचवणे त्यांच्या हातात नव्हते. जवळ किनाऱयाचा आसराही नव्हता. बोट डाव्या कुशीवर 40 अंशात कलली होती. तुफानी वादळाचा व पावसाचा जोर कायम होता. त्याच क्षणी समुद्राच्या दिशेने 20-22 फुट उंचीची महाकाय लाट आली. त्या प्रचंड लाटेने बोटीला प्रवाशांसह जलसमाधी मिळाली. हे भीषण नाटय़ अवघ्या सात-आठ मिनिटांत घडले, असे अपघाताच्या चौकशीनोंदीत आहे. लाइफ जॅकेट, फळ्या, बांबू इ. सहाय्याने काहीजणांनी, तर तरबेज पोहणाऱयांनी कसेतरी स्वतःचे प्राण वाचवले. काही सुदैवी आठ-दहा तासांनी पोहत, तरंगत भरतीच्या लाटांच्या ओघात रेवस, पिरवाडी, मांडवा व करंजाच्या किनाऱयाला लागले. या बोटीवर त्यावेळी बिनतारी संदेशवहनाची सोय नव्हती. रेडिओ ऑफिसरही नव्हता. त्यामुळे संकटकालीन कुठलेच संदेश पाठवले नाही. संपर्कमाध्यमाच्या अभावामुळे मनुष्यहानी जास्त झाली. मदतीसाठी जेव्हा ताफा तेथे पोहोचला तेव्हा खूप उशीर झाला होता. तेथे ‘रामदास’चे काहीच नामोनिशाण उरले नव्हते. ती सागरतळाला बिलगली होती. शोधपथकाला काही प्रेते, बोटीतल्या वस्तू व रिकामी पिंपे तरंगताना दिसली. पाण्यावर तेलाचे तवंग दिसत होते. काळोख झाल्यामुळे त्यांचे काम बिकट झाले. तरीही शोधपथके रात्रभर कार्यरत होती. त्यामुळे काहींना वाचवण्यात यश आले. बोटीचा कप्तान सुलेमान फळीच्या आधाराने पोहत किनाऱयाला लागला. त्याने रेवस ऑफिसात तार केली व दुर्घटना कळवली.

चौकशीअंती नंतर अनेक गोष्टी उजेडात आल्या. त्यात कप्तान सुलेमानला दोषी ठरवण्यात आले. बोटीत एकूण साडेआठशेपेक्षा जास्त प्रवासी घेतले होते. त्यात विनातिकीट प्रवासी होते. त्याने या धोकादायक वादळाच्या वेळी बोट लाटांशी समांतर ठेवली. त्यामुळे बोट कलंडण्याचा धोका जास्त होता. ही त्याची घोडचूक होती. अशा वेळी पाण्याच्या लाटा छेदत बोट पुढे काढणे उचित झाले असते. सुलेमानचा कप्तानपदाचा परवाना रद्द केला गेला. त्यानंतर प्रत्येक बोटीवर वायरलेस यंत्रणा बसवण्याची सक्ती केली गेली. कारण नोव्हेंबर 1927 साली ‘जयंती’ व ‘तुकाराम’ या दोन प्रवासी बोटी कोकण किनाऱयावर वादळामुळे बुडाल्या होत्या. त्यात खूप माणसे बुडाली होती. त्या बोटींवरही वायरलेस यंत्रणा नव्हती. जून-जुलै-ऑगस्ट महिन्यांत राष्ट्रीय सागर किनाऱयावर प्रवासी जल वाहतूक बंद असावी असा नियम मरीन खात्याने आणला. हिंदुस्थानच्या सागरी किनाऱयावर त्यावेळी ‘रामदास’ची जलसमाधी हा सर्वांत मोठा अपघात ठरला होता. बोट नेमकी कोणत्या ठिकाणी बुडाली हे पाऊण महिन्यांनी समजले. इतर बोटींना अडथळा नको म्हणून 1 एप्रिल 1957 रोजी बोटीचे जीर्ण अवशेष बुचर आयलंडजवळ आणले. रामदास बोट दुर्घटनेत वाचलेले एक साक्षीदार (सामाजिक कार्यकर्ते व रायगडभूषण) बारकूशेट मुकादम यांची आमच्या अभ्यास दौऱयानिमित्ताने अलिबाग-कोळीवाडय़ात 25 वर्षांपूर्वी भेट झाली होती. बोट बुडाली तेव्हा ते अंदाजे 12 वर्षांचे होते. त्यावेळी दहा तास पोहून सुदैवाने त्यांनी किनारा गाठला होता. गेल्या महिन्यात वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

रामदास बोट काश्याच्या खडकावर आपटल्यामुळे बुडाली ही अफवा होती. तुफानी वादळामुळे व महाकाय लाटांनी कलंडून ती बुडाली. आज सात दशकांनंतरही या दुर्घटनेच्या दुःखद स्मृती अनेकांच्या मनाचा थरकाप उडवतात.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या