बेवारस फिरणाऱ्या मनोरुग्ण महिलेला मायेचा हात

सामना प्रतिनिधी । कवठे येमाई

शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे बेवारसपने फिरणाऱ्या अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयाच्या मनोरुग्ण महिलेले आपलेसे करून मायेचा हात दिला आहे तो शिरूरमध्ये प्रथमच विशेष मुलांची शाळा सुरु करणाऱ्या आकांक्षा स्पेशल चाईल्ड स्कूलच्या संचालिका राणीताई चोरे यांनी. हा स्तुत्य उपक्रम राबवत समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

या मनोरुग्ण महिलेचे नाव गीता असून वय 35 ते 40 च्या दरम्यान असल्याचे राणीताई चोरे यांनी सांगितले. दि. ३ रोजी दुपारी त्यांना फोन आला कि, ताई एक स्री बेवारसपणे फिरत आहे. तिचे मानसिक संतुलन ठीक नसून, तुम्ही काहीतरी करा तिला मुले त्रास देत आहेत. हे ऐकून त्यांना खूपच धक्का बसला. सकाळ होताच राणीताई यांनी तिला आणण्यासाठी तातडीने टाकळी हाजी गाठली. त्या महिलेला भेटताच तिने राणीताईंना घट्ट मिठी मारली आणि मोठ्याने रडायला सुरुवात केली. क्षणभर तर त्यांना काहीच सुचेना. कारण तिला बरोबर घेऊन एकटीलाच शिरूरला यायचे होते. महिलाही गाडीत पटकन बसली आणि पोलीस स्टेशनला पोहोचेपर्यंत ती एकसारखी त्यांच्याशी बोलतच होती. मध्येच भावनिक होऊन ती रडत देखील होती. त्यातच तिची तब्येत ठीक नसल्यामुळे तिने उलटीही केली. कसं असेल तिचे आयुष्य आणि का सोडले असेल तिला घरच्यांनी असे वाऱ्यावर? असे खूप प्रश्न भेडसावत असताना राणीताई त्या महिलेसह पोलीस स्टेशनला पोहचल्या. शिरूरचे पोलीस घोडके यांनी पत्र दिले व त्यानंतर मात्र राणीताईंची एक खात्री नक्की झाली की आता ती सुखरुप ठिकाणी पोहोचणार आणि ताबडतोब तिला घेऊन आव्हाळवाडी येथे माहेर संस्थेत त्या पोहोचल्या. तिला तिथे दाखल केले. खरं तर कालच तिच्या बद्दल पोस्ट टाकली होती मदतीसाठी आणि खरंच आज तिला सुखरूप ठिकाणी पोहोचवण्यात आकांक्षाच्या प्रवासात नेहमीच सोबत असणारे गणेश सातव, सुशांत कुटे, दुधाने दादा, शिरूरचे पत्रकार प्रवीण गायकवाड, आवारी स्कूलच्या पवार मॅडम, साखरे मॅडम ह्या सर्वांचे खूप सहकार्य त्यांना मिळाले.