
गौतमी पाटीलच्या राहाता येथील लावण्यांच्या कार्यक्रमात गोंधळ झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. यानंतर हुल्लडबाजांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. परिणामी पेक्षकांची पळापळ झाली आणि आयोजकांना कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला.
राहाता येथे गुरुवारी सायंकाळी गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. मात्र, लावणी सुरू होताच, काही प्रेक्षकांनी गौतमीवर पैशाची उधळण सुरू केली. त्यामुळे गौतमीने नाराजी व्यक्त करत लावणी थांबवली आणि माईक हातात घेत प्रेक्षकांना गोंधळ न करण्याची विनंती केली. गौतमीने डान्स थांबविल्याने प्रेक्षकांनी हुल्लडबाजी सुरू केली. अतिउत्साही प्रेक्षकांना नियंत्रित करताना 60 बाऊन्सरसह आयोजकांची चांगलीच दमछाक झाली.
पोलिसांनी हस्तक्षेप करत गर्दीला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही गोंधळ सुरूच राहिल्याने अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यावेळी प्रेक्षकांची एकच धावपळ उडाली आणि आयोजकांना कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. एवढं होऊनही काही प्रेक्षकांनी गौतमी पाटील गाडीत बसत असताना तिच्या गाडीला घेराव घालत गोंधळ घातला. अखेर बाउन्सर आणि पोलिसांच्या गराडय़ात गौतमी पाटीलला कार्यक्रम स्थळावरून बाहेर काढण्यात आले.