‘वंदे मातरम्’ शॉर्टफिल्मद्वारे दिला राष्ट्रगीताच्या सन्मानाचा संदेश

61

सामना प्रतिनिधी, येवला

येवल्यातील प्रसिद्ध व प्रयोगशिल छायाचित्रकार संजीव सोनवणे यांनी दिग्दर्शकांची धूरा सांभाळीत १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘वंदे मातरम्’ ही शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. अवघ्या ३ तासांमध्ये त्यांनी ही शॉर्टफिल्म पूर्ण केली असून या शॉर्टफिल्मद्वारे राष्ट्रगीताच्या सन्मानाचा संदेश देण्यात आला आहे.

शहरातील कंचनसुधा इंटरनॅशनल शाळेच्या आवारामध्ये ही शूटिंग करण्यात आली. त्यासाठी शाळेतील विद्यार्थी कलाकार म्हणून संयम जैन, गार्गी शेळके, स्वामी सावंत, मनदीपसिंग कांत, अमोल गाडे यांनी प्रमुख भूमिका केली. या विद्यार्थ्यांना अभिनयाचा कसलाही अनुभव नसतानांही दिग्दर्शक संजीव सोनवणे यांनी या मुलांकडून अप्रतिम भूमिका करून घेतल्या. येवलासारख्या छोटय़ा शहरामध्ये आधुनिक तंत्र व सादरीकरणासाठी कोणतीही सुविधा नसताना संजीव सोनवणे यांनी अत्यंत उच्च तांत्रिक दर्जा असलेले सादरीकरण या शॉर्टफिल्मध्ये केल्याचे दिसून येते. ४ मिनिटे २५ सेकंदाच्या या शॉर्टफिल्ममध्ये शाळेतील दोन वेगवेगळ्या धर्मीय मुलांचा फुटबॉल खेळतानांच्या वादातून सुरू झालेली हाणामारी पाहून व्यथित झालेली विद्यार्थिनी मारामारी सोडवण्यासाठी शाळेतील कार्यालयात असलेला तिरंगा घेऊन राष्ट्रगीताला सुरुवात करते अन् मारामारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने दुसऱ्याला मारण्यासाठी हातात घेतलेला दगड खाली टाकून राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहत थांबवलेली मारामारी अन् त्यानंतर त्यांच्यातला मिटलेला वाद या सगळ्या प्रसंगाचे छायाचित्रण तांत्रिकदृष्टय़ा अत्यंत दर्जेदारपणे सादरीकरण केल्याचे या शॉर्टफिल्ममध्ये दिसत आहे.

कंचनसुधा ट्रस्टचे चेअरमन तथा नगरसेवक अजय जैन, समन्वयक अक्षय जैन यांनी संजीव सोनवणे यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी शाळेचा परिसर उपलब्ध करून देत मदत केली. या शॉर्टफिल्मची निर्मिती नम्रता सोनवणे यांनी तर दिग्दर्शन संजीव सोनवणे यांनी केले. कथा संकल्पना संजीव सोनवणे यांचीच असून महेश कावळे यांनी संकलन केले, छायाचित्रण सुनील सरोदे, मयूर सोनवणे यांनी तर मीडिया प्लॅनर म्हणून प्रतीक कुक्कर यांनी मदत केली. येत्या १५ ऑगस्टला या शॉर्टफिल्मचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

मला आवड आहे ती काहीतरी वेगळं करण्याची आपण समाजाच काही तरी देणं लागतो याच भावनेतून मी आजवर ५ ते ६ शॉर्टफिल्म केल्या आहेत. त्यादेखील स्वखर्चाने कुठलाही मोबदला न मिळवण्याच्या हेतूने, आता तयार केलेली वंदे मातरम् या शॉर्टफिल्म बघून मुलांमध्ये एकमेकांविषयी आदर व देश एक, आपण सर्व एक असे वातावरण निश्चितच होईल यामुळेच या शॉर्टफिल्मची निर्मिती केली. – संजीव सोनवणे, दिग्दर्शक

आपली प्रतिक्रिया द्या