मेस्सीची दमदार किक! सहाव्यांदा ठरला फिफाचा सर्वोत्तम खेळाडू

516

आपल्या क्लबसाठी आणि देशासाठी मैदानावर सातत्याने जिवाचे रान करणारा अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीने ‘फिफा’चा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावला. सर्वाधिक सहाव्यांदा त्याने या पुरस्काराला गवणसणी घालून विश्वविक्रम केला.

मागील सत्रात मेस्सीच्या बार्सिलोना क्लबची कामगिरी फारशी समाधानकारक नव्हती. त्याच्या अर्जेंटिना संघाला कोपा अमेरिका स्पर्धेत उपांत्य फेरीत ब्राझीलकडून हार पत्करावी लागली होती, मात्र तरीही मेस्सीची वर्षभर वैयक्तिक कामगिरी शानदार राहिल्याने त्याने या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामध्ये बाजी मारली. मेस्सीचा प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डो याने पाच वेळा तर जोहान क्रफ, मायकल प्लाटिनी व मार्को वान बास्टेन यांनी प्रत्येकी तीन वेळा ‘फिफा’चा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावलेला आहे. मेस्सी या वर्षी खेळलेल्या 54 लढतींत 46 गोल केले व 17 गोलमध्ये सूत्रधाराची भूमिका बजावली. बार्सिलोना क्लबकडून 44 सामने खेळताना त्याने 41 गोल नोंदवले, तर 15 गोलसाठी बहुमोल मदत केली.

 कर्णधार या नात्याने मेस्सीने पहिल्या सत्रात सलग तिसऱ्यांदा  आपल्या संघाला ‘ला लिगा’ किताब जिंकून दिला. चॅम्पियन्स लीगमध्ये मेस्सीने दोन गोल केल्यानंतरही त्याच्या बार्सिलोना क्लबला उपांत्य लढतीत लीवरपूलविरुद्ध हार पत्करावी लागली. चॅम्पियन्स लीगमध्ये मेस्सीने सर्वाधिक  12 गोल करून सलग तिसऱ्यांदा आणि कारकीर्दीत सहाव्यांदा ‘गोल्डन बूट’चा किताब जिंकला. कोपा अमेरिका स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी चिलीविरुद्ध झालेल्या लढतीत रेफ्रीवर टीका केल्याने मेस्सीवर तीन महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. पुनरागमनानंतर त्याला दुखापत झाली. त्यानंतरही मेस्सीने पाच लढतींत सहा गोल केले. ‘ला लिगा’ स्पर्धेत 34 वी हॅटट्रिक नोंदवून त्याने रोनाल्डोची बरोबरी केली, मात्र वर्ल्ड कपचा किताब जिंकण्याचे मेस्सीचे स्वप्न अद्याप पूर्ण झाले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या