१७ नोव्हेंबरला लिओनायडसची आकाशात दिवाळी

53

विजय जोशी, नांदेड

दिव्यांचा उत्सव म्हणजेच दिवाळी संपली असली तरी १७ नोव्हेंबरला आकाशात दिवाळी साजरी होणार आहे. या तारखेला रात्री १२ नंतर पहाटेपर्यंत उल्कावर्षाव पाहायला मिळणार आहे. तासाला १५ ते २० उल्का पहायला मिळणार असल्याने खगोलप्रेमींसाठी ही रात्र फार महत्त्वाची ठरणार आहे. या उल्का वर्षावाला लिओनायडस म्हणजेच सिंह राशीतील उल्कावर्षाव असं म्हटलं जातं, याचं कारण म्हणजे रात्री १२ च्या सुमारास पूर्वक्षितिजावर सिंह रास उगवेल तेव्हापासून या उल्कावर्षावाला सुरुवात  होते.

खगोलप्रेमींसाठी आनंदाची बाब ही आहे की ज्या दिवशी हा उल्कावर्षाव होणार आहे, त्या दिवशी अमावस्येची रात्र आहे त्यामुळे हा उल्का वर्षाव अधिक स्पष्टपणे दिसू शकेल. पृथ्वी टेम्पल टटल या धूमकेतूचा मार्ग (कक्षा) ओलांडून जाणार असल्याने  हा उल्कावर्षाव घडतोय. हा धूमकेतू दर ३३ वर्षांनी सूर्यमालेत येऊन सूर्याला फेरी मारून जातो. त्यावेळी धुमकेतूचा अनावश्यक भाग मागे उरतो जो गुरुत्वाकर्षणामुळे हा कचरा पृथ्वीकडे खेचला जातो आणि वातावरणाशी घर्षण होऊन तो पेट घेतो. या सगळ्या प्रक्रीयेमुळे आकाशात लखलखीत प्रकाश शलाका चमकते, काहीवेळेला मोठाले अग्नीगोलही दिसतात. त्यामुळे पृथ्वीवासीयांना नभांगणात नयनरम्य रोषणाई पाहायला मिळते.

उल्कावर्षाव कसा पाहता येईल ?

  • उल्का वर्षाव पाहण्यासाठी उंच, अंधारी टेकडी किंवा डोंगर असेल तर उत्तम
  • घराच्या गच्चीवरुन किंवा विस्तीर्ण मैदानावरून देखील उल्कापात बघता येऊ शकतो
  • सपाट पठारावर चटई किंवा अंथरुण घालून त्यावर झोपून आकाशाचं संपूर्ण दृश्य पाहता आलं तर त्यासारखं दुसरं स्वर्गसुख नसेल
  • तज्ज्ञमंडळी सोबत वही-पेन ठेवतात जेणेकरुन त्यांना काही नोंदी घेता येतात
  • खगोलतज्ञांचे मार्गदर्शन घेतल्यास उल्का वर्षावासोबतच आकाशातील नक्षत्र, राशी, तारका समूहांची माहिती करून घेता येऊ शकते.
आपली प्रतिक्रिया द्या