#MeToo- मी तेव्हा खूप लहान होते! प्रियांका चोप्राच्या वक्तव्याने खळबळ

70

सामना ऑनलाईन । न्यू यॉर्क

गेला काही काळ बॉलिवूडसह अन्य क्षेत्रांना ढवळून काढणाऱ्या मीटू या मोहिमेत आता अजून एक नाव सामील झालं आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनेही लैंगिक शोषणाची शिकार झाल्याचं म्हटलं आहे.

बॉलिवूडमध्ये सुरुवातीच्या दिवसांत मीही लैंगिक शोषणाला सामोरी गेले आहे, असा खुलासा तिने केला आहे. न्यू यॉर्क येथे आयोजित असलेल्या वूमन इन द वर्ल्ड समिटच्या 10 व्या वार्षिक संमेलनात ती बोलत होती. जेव्हा तिला लैंगिक शोषणाबद्दल वैयक्तिक अनुभवांविषयी विचारलं गेलं तेव्हा ती म्हणाली की, इथे उपस्थित प्रत्येक महिला कधी ना कधीतरी लैंगिक शोषणाला बळी पडलेली आहे. मीही माझ्या करिअरच्या सुरुवातीला अशा अनुभवांना सामोरी गेले आहे. तेव्हा मी खूप लहान होते. हे प्रत्येक क्षेत्रामध्ये होताना दिसत आहे. महिलांचं लैंगिक शोषण ही एक सामान्य बाब बनली आहे. पण, आता जेव्हा सर्व स्त्रिया याचा एकत्रितपणे विरोध करताना दिसत आहेत, ही एक चांगली बाब असल्याचंही ती यावेळी म्हणाली.

मीटू या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी पुढे येऊन आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड केलं आहे. यात तनुश्री दत्ता, फातिमा सना शेख, इल्नाझ नवरोझी, टिना मल्होत्रा अशा अनेक अभिनेत्री आणि विनता नंदा सारख्या मीडिया क्षेत्राशी संबंधित महिलांचा यात समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या