
मेट्रो प्रवासादरम्यान जर एखाद्या प्रवाशाचा अपघात झाला. त्या अपघाता त्याला अपंगत्व आलं किंवा दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला तर त्याला पाच लाखापर्यंतची नुकसानभरपाई मेट्रोकडून दिली जाणार आहे. त्यासाठी महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विमा कवच लागू केले आहे. मेट्रो प्रवाशांची प्रवासादरम्यान तसेच स्थानक परिसरात सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रवासादरम्यान संभाव्य धोके लक्षात घेऊन प्रवाशांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 ने प्रवास करणाऱ्या सगळ्या प्रवाशांना आता प्रवासी विमाकवच लागू करण्यात आलं आहे.
या विमा योजनेनुसार अनपेक्षित घटनांमुळे दुर्घटनाग्रस्त प्रवासी रुग्णालयात दाखल झाल्यास त्याला जास्तीत जास्त रू. 1 लाख तर बाह्यरुग्णांसाठी रू.10 हजारापर्यंतची भरपाई मिळणार आहे. तसेच बाह्यरुग्ण उपचार आणि रुग्णालयात दाखल असल्यास रुग्णालयातील संरक्षणा व्यतिरिक्त OPD (बाह्यरुग्ण उपचार) खर्च कमाल रू. 100000/- पर्यंत दिला जाणार आहे आणि किरकोळ दुखापतीच्या भरपाईसह वैद्यकीय खर्चाअंतर्गत जास्तीत जास्त रु.90000/- इतकी भरपाई देण्यात येणार आहे.
तसेच अपघातांदरम्यान प्रवाशांचा मृत्यु झाल्यास 5 लाख रुपये नुकसानभरपाई मिळण्याची तरतूद असून कायमचं किंवा आंशिक अपंगत्व आल्या 4 लाखांपर्यंत नुकसाईभरपाई या विम्याअंतर्गत मिळू शकेल.
ही पॉलिसी ज्या प्रवाशांकडे वैध तिकीट/पास/स्मार्ट कार्ड/क्यूआर कोड/वैध परवानगी असेल अशा सर्व वैध प्रवाशांसाठी लागू असेल. तसेच सदर पॉलिसी ही वैध प्रवासी हा मुंबई मेट्रो स्थानकाची इमारत, प्लॅटफॉर्म किंवा ट्रेनमध्ये किंवा स्थानक परिसरात जसे की सशुल्क आणि विनाशुल्क परिसर (कॉनकोर्स आणि फलाट )अशा सर्व ठिकाणी वैध असेल. पण मेट्रो स्टेशन इमारतीचे बाह्य क्षेत्र जसे की पार्किंग इत्यादी ठिकाणी काही अनिश्चित घटना/अपघात घडल्यास या विमा पॉलिसीचं सरक्षण त्या व्यक्तिला लागू होणार नाही.
सदर विमा पॉलिसीचे फायदे जाहीर करताना महा मुंबई मेट्रो चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक एस. व्ही. आर. श्रीनिवास , भा.प्र.से. म्हणाले “अनेक आंतरराष्ट्रीय मानांकनावर आधारीत उभारलेल्या मुंबई मेट्रोचा प्रवास हा सुरक्षित आहेच. पण सर्व सुरक्षा उपायांव्यतिरिक्त आम्हाला अनपेक्षित उद्भवलेल्या परिस्थितीत प्रवाशांचे जीवन सुरक्षित करणेही अत्यंत गरजेचं होचे. म्हणून आम्ही सर्व मेट्रो प्रवाशांना सर्वसमावेशक विमा संरक्षण प्रदान करत आहोत. हे विमा कवच लागू केल्यामुळे दुर्दैवी घटनेच्या बाबतीत पुरेसे विमा संरक्षण मिळणार असल्याने प्रवाशांना आता निश्चिंत प्रवास करता येईल. आम्ही आमच्या प्रवाशांची सुरक्षितता आणि याचसारख्या कल्याणकारी नाविन्यपूर्ण उपाययोजना करण्यासाठी वचनबद्ध आहोत”