‘मेट्रो’ कारशेडसाठी 3500 झाडे तोडण्याचा प्रस्ताव परत पाठवला

415

‘मेट्रो’ कारशेडसाठी 3500 झाडे तोडण्याचा प्रस्ताव आज शिवसेनेने जोरदार विरोध करून प्रशासनाकडे परत पाठवला. या ठिकाणी असणाऱ्या 27 आदिवासी पाडय़ांतील रहिवाशांचे पुनर्वसन कसे आणि कुठे करणार, तोडलेल्या झाडांच्या बदल्यात झाडे कुठे लावणार, नागरिकांनी घेतलेल्या हरकती-सूचनांवर काय निर्णय घेतला याचे समाधानकारक उत्तर दिल्यानंतरच या प्रस्तावाबाबत पुढील भूमिका जाहीर केली जाईल असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

‘मेट्रो-3’च्या कारशेडसाठी गोरेगाव पूर्व ‘आरे’तील तब्बल 3500 झाडे तोडण्यात येणार आहेत. यातील 2238 झाडे तोडण्यात येणार असून 469 झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहेत. या प्रस्तावाला शिवसेनेने वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत जोरदार विरोध केला आहे. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची परवानगी न घेता हजारो झाडे तोडण्यात आल्यामुळे संबंधितांविरोधात पालिकेने पोलीस कारवाई करावी, एफआयआर दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली.

भूमिगत कारशेड उभारा!

‘मेट्रो’ भूमिगत काढली जाते, मोठमोठे टनेल भूमिगत काढले जातात, मग मेट्रोच्या कारशेडसाठी भूमिगत पर्यायाचा विचार का करीत नाही, असा महत्त्वपूर्ण सवाल यशवंत जाधव यांनी उपस्थित केला. त्यामुळे प्रशासनाने या पर्यायांचाही विचार करावा अशी सूचनाही त्यांनी केली. दरम्यान, शिवसेनेसह विरोधी पक्षानेही झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला विरोध केला. त्यामुळे झाडे तोडण्याचा प्रस्ताव परत पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या