मेट्रो घोटाळा: फडणवीस म्हणतात 400 कोटी खर्च झाले, मेट्रो म्हणते फक्त 70 कोटी

गरज नसतानाही आरेच्या जंगलातील हजारो झाडांची कत्तल करून तिथे मेट्रो कारशेडचे काम करणाऱया माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खोटेपणा उघड झाला आहे. या कारशेडसाठी 400 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा फडणवीस यांनी केला होता. परंतु फक्त 70 कोटी रुपयेच खर्च झाल्याचे मेट्रो प्रशासनाने माहिती अधिकारात सांगितले आहे.

आकडे फुगवून सांगितले

आरेतील निसर्ग वाचवण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या वनशक्ती संघटनेचे स्टालिन दयानंद यांनी मुंबई मेट्रो रेल महामंडळाकडे माहितीच्या अधिकारात यासंदर्भात माहिती मागितली होती. मेट्रोने दिलेली माहिती धक्कादायक आहे. शेकडो कोटी नव्हे तर फक्त 70 कोटी रुपये खर्च झाला असतानाही फडणवीस हे आकडे फुगवून सांगत असल्याचे उघड झाले आहे.

जंगल उद्धस्त करण्यासाठी 34 कोटी

महामंडळाने स्टालिन यांना झालेल्या खर्चाची यादीच दिली आहे. त्यानुसार आरेमधील जंगल उध्वस्त करण्यासाठी 34 कोटी 34 लाख 58 हजार रुपयांचा खर्च केला गेला. त्यात झाडे तोडण्यासाठी 5 कोटी रुपये खर्च झाल्याचे नमूद आहे. इतर तोडकाम आणि बांधकामावर 29 कोटी रुपये खर्च झाला. मेट्रो कारशेडच्या बांधकामासाठी तात्पुरती शेड उभारण्यासाठी 17 कोटी रुपये खर्च करण्यात आले आणि सिमेंटच्या आरसीसी बांधकामासाठी फक्त 2 कोटी रुपये खर्च झाले.

– 330 कोटी कुठे गेले? पर्यावरणप्रेमींचा सवाल

प्रत्यक्षात 70 कोटी रुपये खर्च झाला असताना फडणवीस हे 400 कोटी रुपये खर्चाचा दावा करतात. मग ऊर्वरित 330 कोटी रुपयांचे काय झाले असा सवाल आता आरेतील निसर्गाच्या संरक्षणासाठी आदिवासी व पर्यावरणप्रेमींनी केलेल्या आंदोलनात महत्वाची भूमिका बजावणारे झोरू बथेना यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या