मेट्रोचा विस्तार दक्षिणेकडे विमानतळ तर उत्तरेकडे मीरा-भाईंदरपर्यंत

35

सामना ऑनलाईन, मुंबई

मीरा-भाईंदर महापालिकेच्या ऑगस्ट महिन्यात येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आजमीरा-भाईंदरपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याची घोषणा केली. मुंबईतील मेट्रो प्रकल्पाचा विस्तार दक्षिणेकडे विमानतळापर्यंत तर उत्तरेकडे मीरा-भाईंदरपर्यंत करण्यात येणार असल्याचे सांगत या भागातील वसई-मीरा-भाईंदर जलवाहतुकीची घोषणा करीत मीरा-भाईंदरकरांना खूश करण्याची संधी साधली.

सध्या १७२ किमीपर्यंत प्रस्तावित असलेल्या मेट्रोचा विस्तार २०० कि.मी. पर्यंत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मेट्रो प्रकल्पामध्ये डी. एन. नगर ते दहिसर ही मेट्रो-२ आहे आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व ही मेट्रो-७ आहे. या मार्गाला दक्षिण बाजूकडे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत वाढवणार आहोत आणि उत्तर बाजूकडे मीरा-भाईंदरपर्यंत नेण्याचा निर्णय हा आज घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. यामुळे मीरा-भाईंदरवासीयांची गर्दीच्या प्रवासातून सुटका होणार असल्याचे सांगायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत. याचबरोबर मीरा-भाईंदरला जलमार्गाने जोडण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. एमटीएचएलच्या माध्यमातून मुंबई आणि नवी मुंबई जोडण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. मेट्रोच्या प्रस्तावित प्रकल्पांची माहितीही त्यांनी दिली. नागपूरचा मेट्रो प्रकल्प हा सर्वात जलदगतीने पूर्ण होणारा प्रकल्प ठरणार असून पुण्यातही मेट्रोचे काम वेगाने सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या लोकल प्रवास किश्शावरून सभागृहात हशा
मीरा रोडवरून आपणही एकदा लोकलने मुंबईत आलो होतो. त्याची आठवणही मुख्यमंत्री देकेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितली. सकाळी साडेआठच्या सुमारास मी मीरारोडला होतो. लोकल आल्यानंतर स्टेशनवरील सुमारे तीन हजार प्रवासी ती प्लॅटफॉर्मवर यायच्या आतच लोकलमध्ये घुसले. मीदेखील कसाबसा आत शिरकाव केला. दादर येईपर्यंत मला हात देखील खाली करता आला नाही. स्वत:च्या हाताला खाज आली तर स्वत:चा हातदेखील खाजवू शकत नव्हतो इतकी गर्दी होती असा अनुभव मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगताच हशा पिकला. मीरा भाईंदरकरांची आता या गर्दीच्या त्रासातून सुटका होणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या