भयंकर! संशयित आरोपीच्या घरात सापडली 3 हजार 787 मानवी हाडं

अनेकदा गुन्हेगार आपले गुन्हे लपवण्यासाठी वाट्टेल त्या थराला जातात. अशाच एक गुन्ह्यात संशयित आरोपी असलेल्या माणसाने भयंकर कृत्य केलं आहे. त्याच्या घरात केलेल्या खोदकामात तब्बल 3 हजार 787 मानवी हाडांचे अवशेष सापडले आहेत.

मेक्सिको शहरात ही घटना घडली आहे. हा संशयित आरोपी 72 वर्षीय वृद्ध आहे. ही घटनेचा खुलासा तेव्हा झाला ज्यावेळी तपास यंत्रणेने एका महिलेच्या हत्येच्या प्रकरणात त्याच्या घरात खोदकाम केले. एका पोलीस कमांडरने पत्नी बेपत्ता असल्याचे सांगून या व्यक्तिवर संशय व्यक्त केला होता. ही व्यक्ती त्या पोलीस कमांडरच्या पत्नीच्या परिचयाची होती. कमांड़रच्या पत्नीला तो खरेदीसाठी सोबत घेऊन गेला होता, मात्र खरेदी केल्यानंतर ती घरी परतलीच नाही. त्यामुळे कंमांडरने पत्नी बेपत्ता असल्याचा आरोप त्याच्यावर लावला होता. तपासादरम्यान ही महिला त्या व्यक्तीच्या घरात जाताना दिसत होती, मात्र ती तिथून बाहेर आलीच नाही. त्यानंतर तिचं सामान तिथे सापडले. त्यामुळे त्याच्यावर 34 वर्षीय महिलेची हत्या केल्या प्रकरणी खटला सुरु झाला.

याच प्रकरणाचा तपास करताना संशयित आरोपीच्या घरातील लाद्या फोडून 17 मे रोजी खोदकाम सुरु केले गेले. या खोदकामादरम्यान तपास यंत्रणेला तब्बल 3 हजार 787 मानवी हाडांचे अवशेष सापडले असून अद्याप खोदकाम सुरु आहे. तसेच या घरात अनेक वर्षांपासून बेपत्ता असलेल्या माणसांची ओळखपत्रे आणि काही सामान सापडले आहे. त्यामुळे मिळालेल्या पुराव्यांनुसार या हत्या फार वर्षांपूर्वी झाल्या असल्याचा अंदाज मेक्सिकोच्या तपासयंत्रणेने व्यक्त केला आहे.

सध्या या हाडांच्या अवशेषांचा बारकाईने अभ्यास केला जात आहे. त्यांची काळजीपूर्वक स्वच्छता करुन हाडांचे अवशेष कोणत्या शरीराचा कोणता भाग आहेत याची जुळवणी करुन पाहत आहेत. त्याद्वारे किती माणसांचे अवशेष आहेत याचा पत्ता लावता येणार आहे. आतापर्यंत केलेल्या अभ्यासात हे अवशेष 17 माणसांचे असल्याचा अंदाज आहे. देशाच्या कायद्यातील तरतुदीमुळे संशयित आरोपीचे नाव उघड केलेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या