म्हैसाळ स्त्रीभ्रूण हत्याकांडाचा तपास करणार महिला पोलीस उपअधीक्षक

42

सामना ऑनलाईन, सांगली

राज्याला हादरून सोडणाऱ्या म्हैसाळ स्त्रीभ्रूणहत्याकांडप्रकरणी दोन दलालांना मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक करून त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आतापर्यंत अटक झालेल्यांची संख्या ११ झाली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपअधीक्षक करणार आहे. संदीप विलास जाधव (३२, रा. शिरढोन, शिरोळ) वीरेनगोंडा रावसाब गुमटे (४९, रा. कागवाड, कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे म्हणाले, म्हैसाळ प्रकरण हे महिलेवरील अत्याचार तसेच गर्भलिंग चाचणीसंदर्भातील असल्याने याचा तपास सखोल व्हावा यासाठी तपास शहर विभागाच्या पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्याकडे देण्यात आला आहे. यावर संपूर्ण निरीक्षण अपर पोलीस अधीक्षक यांचे राहील. याशिवाय स्वतः माझे विशेष लक्ष असणार आहे. हा तपास सांगली, मिरज ग्रामीण यासह इतर विभागांतील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी करतील. या गुह्यात तीनप्रकारे तपास केला जाणार आहे. यामध्ये वैद्यकीय क्षेत्र, यातील आर्थिक व्यवहार आणि कायदेशीर बाबींचा समावेश आहे.

खटला फास्ट ट्रकवर चालवा
म्हैसाळ गर्भलिंग तपासणी प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी गुह्यातील सबळ पुरावे गोळा केले जातील. याचा लवकरात लवकर निकाल लागावा यासाठी हा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालविण्याबाबत न्यायालयाला विनंती केली जाणार असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या