अलिबागच्या कौटुंबिक न्यायालयात मिकी माऊस, कार, बाहुली, ढोलकी

पतीपत्नीमध्ये वाद विकोपाला जातो तेव्हा घटस्फोट घेण्याची भाषा सुरू होते. घराचे वातावरण पुरते बिघडून जाते. त्यानंतर चढावी लागते ती कोर्टाची पायरी. रायगड जिल्ह्यातील पहिले कौटुंबिक न्यायालय आजपासून अलिबागमध्ये सुरू झाले आहे. मात्र त्यात नाती तोडण्याऐवजी जोडण्यावरच भर देण्यात आला आहे. तसेच पोषक वातावरण तयार करण्यात आले असून लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारला आहे. त्यात मिकी माऊस, कार, बाहुली, ढोलकी अशी अनेक खेळणी ठेवण्यात आली असून भिंतीही प्राण्यांच्या चित्रांनी रंगवल्या आहेत. या आगळ्यावेगळ्या न्यायालयाची चर्चा सध्या जिल्ह्यात होत आहे.

कच्छी भवन येथे हे कौटुंबिक न्यायालय उभारले असून त्याचे उद्घाटन आज न्यायमूर्ती सुरेश गुप्ते यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले. न्यायालय म्हटले की वकील आणि पक्षकार यांची रेलचेल सुरू असते. लहान मुले किंवा महिला पक्षकारांना न्यायालयात स्वतंत्र अशी बसण्याची सुविधा नसते. मात्र नव्याने स्थापन झालेल्या कौटुंबिक न्यायालयात महिलांसाठी हिरकणी आणि लहान मुलांसाठी खेळण्याचा कक्ष तयार करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास पालकमंत्री आदिती तटकरे, न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे, पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा न्यायाधीश विभा इंगळे, कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश अभय जोगळेकर, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे, बार असोसिएशन अध्यक्ष प्रवीण ठाकूर, नगराध्यक्ष प्रशांत नाईक आदी उपस्थित होते.

स्वास्थ्य टिकवण्याचा प्रयत्न

हे न्यायालय काडीमोड, घटस्फोटाचे केंद्र न बनता कौटुंबिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी प्रयत्न करेल, असा विश्वास जिल्हा न्यायाधीश विभा इंगळे यांनी व्यक्त केला, तर या कौटुंबिक न्यायालयासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या