माढा तालुक्यातील टेंभुर्णी औद्योगिक वसाहतीमधील व साखर काराखान्यांचे रासायनिक मळीमिश्रित प्रदूषित पाणी उजनी कालवा व सीना-माढा उपसा सिंचन कालव्यात तसेच आसपासच्या गावांतील गायरान जमिनीत सोडण्यात येत असल्याने शेतकऱयांच्या शेती, पाण्यासह जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यासंबंधी उपाययोजना करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष औदुंबर देशमुख यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सोलापूर यांच्याकडे केली आहे. याबाबत कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
टेंभुर्णी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये मोठय़ा प्रमाणात कंपन्या आहेत. रासायनिक सांडपाण्याची व्यवस्था कंपनीने करणे गरजेचे आहे. खंडोबा डिस्टिलरी व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि. पिंपळनेर यांचे केमिकलमिश्रित पाणी टेंभुर्णी, तांबवे, सापटणे, कन्हेरगाव, दहीवली, वेणेगाव, आकुंभे, आहेरगाव, बेंबळे, चव्हाणवाडी, पिंपळनेर तसेच प्रामुख्याने जवळच असलेल्या कॅनॉलमध्ये सोडण्यात येत आहे. त्यामुळे आसपासच्या गावांतील विहिरी व कूपनलिकेमध्ये सदरचे पाणी उतरत आहे. त्यामुळे पिकांची मोठी हानी होत आहे. तसेच जनावरांची व मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदरचे पाणी पिल्याने लहान बालकांना आजार होत आहेत. संबंधित यंत्रणेकडे गावकऱयांनी तक्रार केली असता, कोणतीही दखल घेतली नाही. याबाबत योग्य ती कारवाई करून आसपासच्या गावांमध्ये होत असलेल्या प्रदूषणास आळा बसवावा. आपण या निवेदनाचा तत्काळ विचार करून त्वरित योग्य ती काही कार्यवाही करावी; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी प्रमोद शिंदे, सोमनाथ खडके, सचिन खडके आदी उपस्थित होते.