प्रबोधन मुंबई ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धा- एम.आय.जी.चा अविश्वसनीय विजय

369

सामना प्रतिनिधी, मुंबई

कर्णधार सुमित घाडीगावकर (75), गौरव जठार (55) आणि स्वप्नील साळवी (नाबाद 55) यांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे एम.आय.जी. संघाने पय्याडे स्पोर्टस् क्लबचे 230 धावांचे अशक्य वाटणारे आव्हान लीलया पार केले आणि बाराव्या प्रबोधन मुंबई ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत चार विकेटनी विजय मिळविला. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात गतविजेत्या दादर युनियन संघाने पार्कोफेन क्रिकेटर्सविरुद्ध आठ विकेट राखून विजय मिळविला. सकाळच्या सत्रात एकतर्फी लढत झाल्यानंतर दुपारच्या सत्रातील लढतीने येथे गर्दी करणाऱया चाहत्यांना दर्जेदार खेळाचा आनंद दिला.

एम.आय.जी. संघाने पय्याडे संघाला प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय त्यांच्या अंगलट येणार असाच सर्वांचा समज झाला होता. कारण पय्याडे संघाने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 230 धावांचा डोंगर उभारला. पराग खानापूरकर (88), रौनक शर्मा (41) आणि ऐश्वर्य सुर्वे (32) यांच्या दमदार फलंदाजीमुळे हे शक्य झाले. या आव्हानाचा पाठलाग करताना एम.आय.जी. संघाने 4.5 षटकांतच 2 बाद 56 अशी धडाकेबाज सुरुवात केली. सुमित घाडीगावकर आणि गौरव जठार (55) यांनी तिसऱया विकेटसाठी केवळ 56 चेंडूंत 116 धावांची भर टाकताना चौफेर फटकेबाजी केली. हे दोघे लागोपाठ बाद झाल्यानंतर स्वप्नील साळवीने नाबाद 51 धावा फटकावून संघाचा विजय साकार केला. तत्पूर्वी सकाळी हिंदुस्थानचे माजी कसोटीवीर करसन घावरी यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले.

आपली प्रतिक्रिया द्या