मजुरांकडून तीनपट पैसे उकळले, विरोध केल्याने बेदम मारहाण; गुजरातमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा प्रताप

गुजरातमध्ये स्थलांतरित मजुरांकडून तीन पट पैसे उकळले जात आहे. याला विरोध केल्याने भाजप कार्यकर्त्यांनी मजुरांना बेदम मारहाण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सुरतमधील हा प्रकार असून गुजरात काँग्रेसने याचा पर्दाफाश केला आहे.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने स्थलांतरित मजुरांसाठी विनाशुल्क ‘श्रमिक रेल्वे’ चालवण्याचा निर्णय घेतला, मात्र दुसरीकडे भाजपची सत्ता असणाऱ्या गुजरातमध्ये मात्र मजुरांकडून तीन पट पैसे घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. विरोध केल्याने मजुरांना भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप काँग्रेस नेते सरल पटेल (Congress leader Saral Patel) यांनी केला आहे. याचा व्हिडीओ त्यांनी आपल्या ट्विट अकाउंटवर शेअर केला.

काँग्रेस नेते सरल पटेल यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत स्थलांतरित मजुराने गंभीर आरोप केले आहेत. भाजप कार्यकर्ता (BJP worker Rajesh Verma) याने रेल्वे तिकिटासाठी पैसे उकळल्याचा आरोप मजुराने केला. ‘आम्ही त्याला तिकिटासाठी 1 लाख 166 हजार रुपये दिले. प्रत्येकी 2 हजार रुपये तिकिटाप्रमाणे आम्ही त्याला पैसे दिले होते. मात्र त्याने आमचे पैसेही परत केले नाही आणि तिकीटही दिले नाही. याबाबत त्याला विरोध केला असता त्याने आणि त्याच्या माणसांनी मला लाकडी काठीने आणि लाथा-बुक्यांनी रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली’, असा आरोप मजुराने केला आहे.

राजेश वर्मा याने मला बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे माझे डोके सुन्न झाले होते. माझ्याकडे त्याने पैसे घेतल्याचा पुरावा आहे. आम्हाला सर्वांना टोकन देण्यात आले होते, मात्र तिकीटही मिळाले नाही आणि आमचे पैसेही परत मिळाले नाही, असा आरोप मजुरांनी केला. तसेच आमच्याकडे घरी जाण्याचा कोणताही मार्ग नाही. कृपया आम्हाला तिकीट देण्यात यावे, अशी विनवणी मारहाण झालेल्या मजुराच्या बाजूला उभ्या असणाऱ्या अन्य एका मजुराने केली.

गुजरात काँग्रेसने ही घटना लाजिरवाणी असून याचा निषेध केला आहे. मात्र सुरत भाजपचे प्रमुख नितीन भजियावला यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले असून राजेश वर्मा आमचा कार्यकर्ता नसल्याचे म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या