वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम भागातील 37 कुटुंबांचे स्थलांतर

मुसळधार पावसामुळे पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील 37 कुटुंबांतील 153 जणांचे स्थलांतर पुणे ग्रामीण पोलीस आणि प्रशासनाने केले. रहिवाशांची शाळा, मंदिरे तसेच नातेवाईकांकडे निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना भोजन आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

वेल्हे तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून तीन दिवसांपूर्वी घरांना तडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली
होती. सह्याद्रीच्या डोंगररांगात वेल्हे तालुका असून येथून रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात जाण्यासाठी दुर्गम भागातून जाणाऱ्या शिवकालीन वाटा आहेत. कडे-कपारीतून पायपीट करून महाड तालुक्यात उतरता येते. त्यानंतर रविवारी (25 जुलै) मध्यरात्री दीडच्या सुमारास कडा कोसळून मोठा आवाज झाला होता. वेल्हे पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार, तहसीलदार शिवाजी शिंदे, केळद गावचे सरपंच रमेश शिंदे यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांना स्थलांतराबाबतची विनंती केली. मात्र, ग्रामस्थ स्थलांतरित होत नव्हते.

पवार, शिंदे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, पंचायत समिती सभापती दिनकर धरपाळे, नाना राऊत यांनी पुन्हा कर्नवडी, केळद, निगडे खुर्द भागातील ग्रामस्थांची भेट घेऊन संभाव्य धोक्याची जाणीव करून दिली. त्यानंतर 37 कुटुंबांतील 153 जणांचे स्थलांतर करण्यात आले. जेसीबी यंत्राच्या साहाय्याने कर्णवडी ते रानवडी रस्त्याची डागडुजी करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या