रोजगारासाठी आखाती देशात जाणाऱ्यांची संख्या 62 टक्क्यांनी घटली

28

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रोजगारासाठी आखाती देशात जाणाऱ्या हिंदुस्थानींच्या संख्येत झपाट्याने घट झाली आहे. नोव्हेंबर 2017 ते 2018 या वर्षभराच्या काळात आखाती देशात जाणाऱ्यांच्या इमीग्रेशन क्लिअरन्समध्ये 21 टक्क्यांनी घट झाली आहे. ही संख्या यंदा 2.95 लाख होती. गेल्या पाच वर्षात सर्वाधीक 7.76 लाख कामगार 2014 मध्ये आखाती देशात गेले होते. गेल्या पाच वर्षातील आकडेवारी पाहता आखाती देशात जाणाऱ्यांची संख्या 62 टक्क्यांनी घटली आहे. तर गेल्या काही वर्षात फक्त कतारमध्ये जाणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कामगारांना देण्यात येणाऱ्या इमीग्रेशन क्लिअरन्सच्या नोंदणीचे काम करणाऱ्या ‘ई मायग्रेट इमीग्रेशन क्लिअरन्स डेटा’ ने ही आकडेवारी दिली आहे.

आखाती देशात जाणाऱ्या कामगाऱ्यांच्या संख्येत 2018 मध्ये सर्वाधीक घट झाली आहे. या वर्षात फक्त 1.30 लाख लोक म्हणजे 35 टक्के कामगार रोजगारासाठी यूएईमध्ये गेले आहेत. तर 65 हजार जण सौदी अरबमध्ये तर 52 हजार जण कुवैतला गेले आहेत. 2017 पासून आखाती देशात जाणाऱ्या हिंदुस्थानींच्या संख्येत घट होण्यास सुरुवात झाली आहे. सौदीच्या वाढत्या सौदीकरणाच्या धोरणामुळे परदेशी कामगारांना आखाती देशात जाण्याच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत. या नव्या योजनेमुळे सौदीतील ठरावीक कंपन्याच परदेशी कामगारांना नोकरीवर ठेवण्यासाठी ब्लॉक व्हिसासाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे आखाती देशात रोजगारासाठी जाणाऱ्या हिंदुस्थानींची संख्या घटत आहे. 2014 मध्ये सुमारे 3.30 लाख कामगार सौदीत गेले होते. पाच वर्षात या संख्येत 80 टक्क्यांनी घट झाली आहे. आखाती देशातील कतारमध्ये जाणाऱ्यांची संख्या मात्र वाढली आहे. 2017 मध्ये 25 हजार कामगारांच्या तुलनेत 2018 मध्ये 31 टक्क्यांची वाढ होत ही संख्या 32,500 वर पोहचली होती.

गेल्या काही वर्षात रोजगारासाठी आखाती देशात जाणाऱ्यांची संख्या घटण्याची अनेक कारणे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती घटल्याने या देशांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या देशांनी परदेशी कामगारांच्या संख्येत कपात केल्याने संख्या घटल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. तसेच वाढत्या सौदीकरणाच्या धोरणामुळे स्थानिकांना नोकऱ्या देणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेकजण टूरिस्ट वीजा घेऊन आखाती देशात जात आहेत आणि त्या देशात गेल्यानंतर वर्क व्हिसा मिळवत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या