Worli hit and run वेळी गाडी चालवत असल्याची मिहीर शहाची कबुली, सूत्रांची माहिती

mihir-worli-hit-&-run

मुंबईतील Worli hit and run प्रकरणातील मुख्य आरोपी मिंधे गटाच्या नेत्याचा मुलगा मिहीर शहा याने स्कूटरला बीएमडब्ल्यूने धडक दिली आणि त्यात महिलेचा मृत्यू झाला त्यावेळी स्वत: गाडी चालवत असल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. चौकशीदरम्यान मिहीरने त्या घटनेची आणि त्यानंतर काय घडलं याची तपशीलवार माहिती दिली.

मिहीर (24) हा मिंधे गटातील नेता राजेश शहा याचा मुलगा आहे. अपघात झाला तेव्हा रविवारी सकाळपासून तो फरार होता. त्याला मुंबईजवळील गोरेगाव येथून अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिहीरची संध्याकाळ जुहूच्या बारमध्ये सुरू झाली. त्यानंतर त्याच रात्री त्याने जुहू ते बोरिवलीपर्यंत गाडी चालवली आणि नंतर वरळीच्या दिशेने जाण्यापूर्वी मरीन ड्राइव्हकडे निघाले. वरळीजवळ त्याने दुचाकीला धडक दिली आणि महिलेला फरफटत नेले ज्यात त्या महिलेचा मृत्यू झाला.

त्यानंतर घाबरलेल्या मिहीरने त्याचे वडील वांद्रेला पोहोचण्यापूर्वीच घटनास्थळावरून पळ काढला. घरी परतण्याऐवजी त्याने गोरेगाव येथील मैत्रिणीच्या घरी आश्रय घेतला.

ताब्यात घेतले तेव्हा, मिहीरने त्याची ओळख लपवण्यासाठी चेहऱ्यात काही बदल केला असावा असा संशय तपासकर्त्यांना आहे.

पोलिसांनी मिहीरविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. हिट-अँड-रन दरम्यान पॅसेंजर सीटवर बसलेल्या त्याच्या ड्रायव्हरलाही अटक करण्यात आली आहे, तर त्याची आई मीना, बहिणी पूजा आणि किंजल आणि मित्र अवदीप यांचीही पोलीस चौकशी करत आहेत. आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार असून, पुढील तपासासाठी अधिकारी त्याची कोठडी मागणार आहेत.