दूध भेसळीवर कारवाई; दहा वर्षांपूर्वीच्या अहवालाचे काय झाले?

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे झालेल्या कारवाईनंतर नगर जिह्यातील दूधभेसळीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस प्रशासनाने दूध भेसळीविरोधात यापूर्वी जिह्यात ठिकठिकाणी केलेल्या कारवायांनंतर त्याचा अहवाल तयार केला होता. मात्र, आजही हा अहवाल गुलदस्त्यातच असून, त्याचे पुढे काय झाले, हे समजू शकलेले नाही.

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे 16 मार्च रोजी दूध भेसळीवर धडक कारवाई करण्यात आली. नगर जिह्यात यापूर्वीही जिल्हा पोलीस प्रशासन व अन्न व औषध प्रशासनाने दूध भेसळीविरोधात पारनेर, नगर तालुका, श्रीरामपूर तालुका, राहुरी तालुका आदी भागांमध्ये कारवाया करण्यात आल्या होत्या. या कारवायांमुळे दूध भेसळीला काही प्रमाणात ब्रेक लागला होता. तत्कालीन कारवाईतही नगर जिह्याबाहेर या भेसळीचे धागेदोरे आढळल्याने याची व्याप्ती मोठय़ा प्रमाणावर असल्याचे सांगण्यात येत होते. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी नगर जिह्यातील दूध धंद्याच्या संदर्भामध्ये धडक कारवाई मोहीम हाती घेतली होती. दूध भेसळीविरोधात धडक कारवाई करून त्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. श्रीरामपूर विभागाचे तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची या चौकशी पथकाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. कडासने त्यांनी जिह्यातील प्रत्येक दूध संकलनाच्या ठिकाणी जाऊन समक्ष माहिती घेतली होती. धाडी टाकलेल्या ठिकाणीही त्यांनी माहिती गोळा केली होती. दुधात भेसळीसाठी कोणते पदार्थ वापरले जातात, ते कोठून व कसे आणले जातात, याचा बारकाईने अभ्यास करून त्यांनी अहवाल तयार केला होता. मात्र, तो अहवाल आजपर्यंत बाहेर आलेला नाही.  जिह्यात अनेक वर्षांपासून दुधाची भेसळ होत आहे. नगर जिह्यात दूध मुंबई, पुण्यासह राज्यभर पाठविले जाते. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या कारवायांमुळे राज्यभर खळबळ माजली होती. नाशिकमध्ये तर कोटय़वधी लिटर नष्ट करण्यात आले होते.

आता पुन्हा एकदा पोलिसांनी धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. या प्रकरणात आजपर्यंत 16 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात जिह्याबाहेरील काही जणांचाही समावेश असल्याने गुह्याची व्याप्ती मोठय़ा प्रमाणावर असल्याचे दिसून येत आहे. मात्र, पोलीस प्रशासनाने दहा वर्षांपूर्वी केलेल्या कारवाईचा अहवाल व त्यामध्ये नेमके कोण गुन्हेगार आहेत, ही माहिती घेतली, तर दूध भेसळीतील अनेक गोष्टी या उघड होण्याची शक्यता आहे.

काष्टी प्रकरणात नव्याने पाच नावे निष्पन्न

 या दूधभेसळ प्रकरणात दररोज नवीन नावे समोर येत असून, पोलिसांनी अटक केलेल्या 6 जणांना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे, तर नव्याने 12 जणांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या रॅकेटमध्ये भेसळ करणारे उत्पादक, संकलन केंद्र, चिलिंग प्लाण्ट, केमिकल वितरक, प्रक्रिया उद्योजक अशी मोठी साखळी उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, आज सतीश ऊर्फ आबा कन्हेरकर (रा. भानगाव, ता. श्रीगोंदा), महेश मखरे (रा. मखरेवाडी, ता. श्रीगोंदा), शुभम बोडखे (रा. श्रीगोदा), समीर शेख (रा. राहुरी, जि. अहमदनगर), कैलास लाळगे (रा. शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांची नावे नव्याने समोर आली आहेत. सर्व फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

संभाजी ब्रिगेडचा मोर्चा

 दुधात केमिकल मिसळून दूध भेसळीचे रॅकेट समूळ उद्ध्वस्त करा, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱयांचा सहभाग असल्याची शंका असल्याने सीआयडी चौकशी करा, अशा विविध मागण्या करीत दूध भेसळवर कठोर कारवाईसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज तहसील कार्यालयात मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. यावेळी बाबासाहेब भोस, दत्तात्रय पानसरे, डॉ. प्रणोती जगताप, बाळासाहेब नाहाटा, आदेश नागवडे, प्रा. बाळासाहेब बळे, भाऊसाहेब खेतमालिस, सुनील वाळके, बापूतात्या गोरे, रमेश लाढणे, संजय खेतमाळीस, सतीश बोरुडे, युवराज पळसकर, वैभव मेथा, जहिर जकाते आदींसह नागरिक सहभागी झाले होते.