पाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

हिंदुस्थानला आव्हान देण्याची भाषा करणारा पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडला आहे. शुक्रवारी डॉलरच्या तूलनेत पाकिस्तानचा रुपया घसरून 160 वर पोहोचला. तर दुसरीकडे महागाईचा भडका उडाला असून दूध 200 रुपये प्रतिलीटरवर झाले आहे. पाकिस्तान सरकारने महागाई आटोक्यात आणली नाही तर देशाची आर्थिक स्थिती नियंत्रणाबाहेर जाईल असा इशारा स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने दिला आहे.

पाकिस्तानची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस आणखीनच बिकट होत चालली आहे. महागाईच्या विस्फोटामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेदेखील अशक्य झाले आहे. भाजीपाल्यासह कडधान्यांच्या किमतीमध्ये 45 ते 80 टक्यांपर्यंत वाढ झाली आहे. तर सफरचंद 400 रुपये किलो, संत्री 360 रुपये किलो असून केळी 150 रुपये डझनने विकली जात आहेत. तर मटण तब्बल 1100 रुपये प्रति किलोने विकले जात आहे. पाकिस्तानात सोन्याचा भाव देखील प्रतितोळा 65 हजारांवर पोहोचला आहे. तसेच पेट्रोल-डिझेलच्या किमतीसह घरगुती गॅसच्या किमती देखील गगनाला भिडल्याने सामान्य नागरिकांना जगणे देखील कठीण झाले आहे. त्यातच स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने व्याजदर वाढवून 12.25 केला आहे. पाकिस्तानला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी नागरिकांना संपत्ती घोषणा योजनेअंतर्गत सर्व नागरिकांनी 30 जूनपर्यंत आपल्या अघोषित संपत्तीची माहिती द्यावी आणि कर भरणा करण्याचे आवाहन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या