पैलवानांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरून भाजप मंत्र्याची पळापळ, उत्तरे नसल्याने धूम ठोकली

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व भाजप खासदार बृजभूषण शऱण सिंग यांना अटक होत नसल्याने मंगळवारी कुस्तीपटूंनी त्यांची पदके गंगेत विसर्जित करण्याचे ठरवले होते. त्याबाबत केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेखी यांना पत्रकारांनी प्रश्न केला असता त्या चक्क धावत त्या ठिकाणावरून निघून गेल्या. पत्रकारही त्यांच्या मागे धावत त्यांना प्रश्न विचारत होते. मात्र लेखी जराही न थांबता व कोणत्याही प्रश्नाचे उत्तर न देता धावत जाऊन गाडीत बसल्या. त्यांच्या या पळापळीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मंगळवारी बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट हे ऑलिम्पियन कुस्तीपटू हरिद्वार येथील गंगा नदीच्या किनाऱयावर आपली पदके विसर्जित करण्यासाठी दाखल झाले होते, मात्र शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी खेळाडूंची समजून काढून त्यांचे मन वळविले. त्यामुळे कुस्तीपटूंची पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय तूर्तास टळला आहे.

हिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कुठलीच कारवाई होत नसल्यामुळे या कुस्तीपटूंनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

पदकांना कवटाळून रडले कुस्तीपटू

देशासाठी मिळविलेली पदके हरिद्वारच्या गंगेत विसर्जित करण्यासाठी गेल्यानंतर ऑलिम्पियन कुस्तीपटू त्या पदकांना कवटाळून ढसाढसा रडले. जी पदके जिंकण्यासाठी रक्ताचं पाणी केलं, तीच पदकं नाइलाजाने गंगेत विसर्जित करण्याची वेळ आल्याने या कुस्तीपटूंना हुंदके अन् अश्रू आवरता आले नाही. ते गंगाकिनारी तासभर रडत बसले होते. जणू एखाद्या सांत्वन सभेसारखं या ठिकाणी वातावरण तयार झालं आहे.