सर्वसामान्यांच्या भल्यासाठी शिवसेना-भाजप युती गरजेची!

सामना विशेष प्रतिनिधी । मुंबई

शिवसेना व भाजप युती झाली नाही तर सर्वसामान्य माणसाचे, महाराष्ट्राचे व देशाचे नुकसान होईल. सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी युती व्हायला हवी. शिवसेना-भाजप युती झाली तर काँग्रेस-राष्ट्रवादी भुर्रकन उडून जाईल. युतीसाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी सांगितले. लोकसभेत युती झाली तर 48 जागांवर हात मारू असेही ते म्हणाले.

मंत्रालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत युतीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, शिवसेना- भाजपने एकत्र निवडणुका लढवल्या तर समोर कोणी उरणारच नाही. लोकसभेत युतीच्या 42 जागा आहेत. युती झाली तर या 42 जागा टिकवूच, पण उरलेल्या सहा जागांवरही हात मारू. विधानसभेत युतीच्या 185 जागा आहेत. युती झाली तर या जागा मिळवूच, पण आणखी दहा-वीस जागांवर हात मारू. म्हणून पत्रकारांच्या माध्यमातून मी शिवसेनेला आवाहन करतो असा खुलासा त्यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्री शिवसेनेचा
युती होऊन सत्ता आली तर मुख्यमंत्री कोणाचा असा प्रश्न पत्रकारांनी केला त्यावर ते म्हणाले की, सरकार आल्यावर मुख्यमंत्री कोणाचा तो फॉर्म्युला ठरतो. ज्याचा एक आमदार अधिक त्याचा मुख्यमंत्री होतो. युती झाली आणि भाजपपेक्षा शिवसेनेचा एक आमदार जास्त निवडून आला तर शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगतील त्याला मुख्यमंत्री करू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

शिवसेनेशी संवाद सुरू आहे
शिवसेनेशी आमचा संवाद सुरू आहे. युती करण्याचे आवाहन आम्ही शिवसेनेला खासगीतही करत आहोत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येऊ नये. तुमचे आमचे काही नको, फक्त शिवसेना-भाजपचे सरकार यावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

निवडणुका एकत्र नाहीत
लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, दोन्ही निवडणुका एकत्र घेता येणे शक्य नाही असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.