फुले, आंबेडकरांनी भीक मागून शाळा चालवली; मंत्री चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त विधान

कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांनी भीक मागून शाळा उभारल्या. त्यांनी सरकारकडे अनुदान मागितले नाही. मग तुम्ही कशाला सरकारी अनुदान मागता?’

भाजपने महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान करण्याचा अफजलखानी विडाच उचलला आहे. जेथे संतमहंतांचे विचार शिकवले जातात त्या पैठण येथील संतपीठात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले या थोर पुरुषांचा घोर अवमान केला. कर्मवीर, डॉ. आंबेडकर, फुले यांनी शाळा सुरू करताना भीक मागितली असे संतापजनक वक्तव्य पाटील यांनी केले. एवढेच नाहीतर आपल्या वक्तव्याचे कोडगे समर्थन करताना चंद्रकांत पाटील यांनी माधुकरी म्हणजेही एक प्रकारची भीकच आहे ना, असे अकलेचे तारे तोडत वारकऱ्यांनाही भिकाऱ्यांच्या रांगेत उभे केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या पैठण येथील संतपीठात आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. पालकमंत्री संदिपान भूमरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची यावेळी उपस्थिती होती. या कार्यक्रमाला पैठण परिसरात वारकरी शिक्षण संस्था चालवणारे अध्यात्म क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरली. ‘कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांनी भीक मागून शाळा उभारल्या त्यांनी सरकारकडे अनुदान मागितले नाही, मग तुम्ही कशाला सरकारी अनुदान मागता?’ असा सवाल त्यांनी उपस्थित संस्थाचालकांना केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

अपमानाचे कोडगे समर्थन

विशेष म्हणजे, संतपीठातील कार्यक्रम आटोपल्यानंतर वृत्तवाहिन्यांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी आपल्या विधानाचे कोडगे समर्थन करताना वारकऱ्यांनाही भिकाऱ्यांच्या रांगेत आणून बसवले. ‘संस्था उभी करणे आणि चालवणे यासाठी महापुरुषांनी हात पसरले. म्हणजे काय केले?’ असा उफराटा प्रश्न विचारत ‘वारकरी संप्रदायात माधुकरी मागून शिक्षण घ्यावे लागते. माधुकरी म्हणजे भीकच आहे!’ असे अकलेचे तारे चंद्रकांत पाटील यांनी तोडले.

हा जाणूनबुजून केलेला अपमान जयंत पाटील

चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. फुले-आंबेडकरांनी भीक मागून शाळा उभारल्या हे चंद्रकांत पाटील यांचे विधान चुकीचे तर आहेच, पण महापुरुषांच्या रचनात्मक कार्याच्या उभारणीला भीक मागण्याची उपमा देणे, हा त्यांचा जाणूनबुजून केलेला अपमानच आहे.

रामदास आठवलेंनी सावरली पाटलांची बाजू

पाटील यांनी काय वक्तव्य केलं ते माहित नाही. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांनी डोनेशन न घेता, स्वतŠच्या पैशातून शाळा सुरू केल्या होत्या. कदाचित त्यांना असं म्हणायचं असेल की लोकांनी स्वत:च्या बळावर शाळा सुरू कराव्यात, असे सांगत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पाटील यांची बाजू सावरली.

पाटलांनी प्राथमिक शिक्षणाचे धडे घ्यावेत – रुपाली चाकणकर

महात्मा फुले हे त्या काळातील एक प्रथितयश उद्योगपती होते आणि ज्ञानाचा महासागर असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतŠच्या कर्तृत्वावर बहुजनांसाठी शिक्षणाची दारं खुली केली हे जगजाहीर आहे. पाटील यांच्या वक्तव्यातून महापुरुषांबद्दल त्यांच्या मनामध्ये किती पूर्वदूषित धारणा आहे हे दिसून येते. पाटील यांनी प्राथमिक शिक्षणाचे धडे घ्यावेत हीच माफक अपेक्षा, असा टोला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लगावला आहे.

भीकआणि लोकवर्गणीयातील फरक तरी कळतो का?

भीक आणि लोकवर्गणी यातील फरक कळतो का असा संतप्त सवाल करतानाच, महापुरुषांच्या बदनामीचे भिकारचाळे बंद करा, असा हल्लाबोल कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर केला आहे. पटोले म्हणाले की, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, भाऊराव पाटील यांनी  लोकांकडून वर्गणी, देणगीच्या स्वरुपात पैसे जमा केले आणि बहुजन समाजातील गोरगरीबांच्या मुलांसाठी शाळा सुरू केल्या. पाटील यांनी या महापुरुषांचाच नव्हे तर बहुजन समाजाचाही अपमान केला आहे.