संदिपान भुमरे यांची बिनटाक्याची शस्त्रक्रिया मतदारच करणार – अंबादास दानवे

मंत्री संदिपान भुमरे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना लाज-शरम वाटली नाही का? सासरी जाताना मुलीच्या डोळ्यात येणाऱ्या अश्रूंचा हा अपमान आहे. सत्ता संपत्तीचा माज चढलेल्यांना त्यांचे पाप येथेच फेडावे लागेल. जनतेच्या रोषामुळे या बेईमानांची राजकीय शस्त्रक्रिया फार अवघड राहिलेली नाही. मतदारच आता ही बिनटाक्याची शस्त्रक्रिया करणार आहेत !’ असा घणाघात विधानपरिषद विरोधी पक्षनेते तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी पैठण येथील आयोजित नागरी सत्कार समारंभ प्रसंगी केला.

तालुकाप्रमुख मनोज पेरे यांनी आयोजित केलेल्या या सभेस राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावर उपस्थिती लावून भाषणेही केली. महाविकास आघाडीतर्फे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. अभिनंदन मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पुढे म्हणाले की, संघटनेशी बेइमानी करणाऱ्या मंत्री संदिपान भुमरे यांची राजकीय शस्त्रक्रिया सोपी झाली आहे. जनताच यांची बिनटाक्याची शस्त्रक्रिया करणार आहे.’ असे स्पष्ट केले.

पैठण येथील जायकवाडी धरणासह 11 प्रकल्पांना जोडून ‘मराठवाडा वॉटरग्रीड’ योजना मंजूर केली आहे. 1 हजार 340 किलोमीटर अंतर असलेल्या या योजनेला ठाकरे सरकारने मान्यता दिली. असा संदर्भ देत अंबादास दानवे यांनी सांगितले की, गद्दार मंत्री संदीपान भुमरे यांना 11 प्रकल्पांची नावे माहीत नाहीत. कोणताही अभ्यास नाही. लोककल्याणाची तळमळ नाही. परंतु केवळ शिवसेना या चार अक्षरी मंत्राचा फायदा घेत यांनी स्वतःची तुंबडी भरली, असेही दानवे यांनी सांगितले. ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजना ही ठाकरे सरकारने 2020 साली मंजूर केली, परंतु गद्दार मंत्री संदीपान भुमरे हे पैठणच्या सभेत बोलताना ‘अडीच वर्षें मी ही फाईल घेऊन फिरत होतो, मात्र कोणीच विचारले नाही. आता शिंदे सरकारने मान्यता दिली.’ असे खोटे बोलत असल्याचे स्पष्ट केले. यासाठी उपलब्ध कागदपत्रे त्यांनी दाखवली. वास्तविक या योजनेचे 56 कोटी रुपयांचे टेंडर या गद्दाराने आपल्या जावयाला दिले. तेसुद्धा बेकायदेशीर रजिस्ट्री करून हा खटाटोप त्यांनी केला.

अब्दुल सत्तार यांनी तर ‘आम्ही व्यवसाय करू नये का?’ असा सवाल केल्याने जावयाला रोहयोच्या मंत्र्यांनी ‘रोजगार’ दिल्याचे स्पष्ट झाले आहे.’ , असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील अतिवृष्टी, पैठण संभाजीनगर चौपदरीकरण आदींवरही सविस्तर मतप्रदर्शन केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, तालुकाप्रमुख मनोज पेरे, बिडकीनचे माजी सरपंच अशोक धर्मे, महिला आघाडी जिल्हासंघटक राखी परदेशी, माजी आमदार संजय वाघचौरे, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय गोर्डे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब निर्मळ व कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद तांबे यांनी मनोगत व्यक्त केले.

सूत्रसंचालन माजी शहरप्रमुख प्रकाश वानोळे यांनी केले. प्रामुख्याने संभाजीनगर उपशहरप्रमुख रतनकुमार साबळे, व्यापारी आघाडी जिल्हासंघटक संजय लोहिया, विभागप्रमुख सुरेश गायके, बंडू वाघचौरे, नांदरचे सरपंच अ‍ॅड. किशोर वैद्य, जिल्हा युवा अधिकारी शुभम पिवळ, तालुका अधिकारी विकास गोर्डे, भाऊसाहेब पिसे, ठकुबाई कोथिंबीरे, माजी नगरसेविका मंगल मगर, नीता कायस्थ, राजू परदेशी, लक्ष्मण मुळे, संजिव कोरडे, गणेश पवार, शत्रुघ्न, कुमार काळे, शुभम शिवाजी काळे, सोमनाथ जाधव, मनोज लक्कडहार व आकाश काळे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.