सभागृहाचा वापर करून राष्ट्रपती राजवटीची धमकी देऊ नका, नवाब मलिक यांनी भाजपला सुनावले

हल्लीच्या काळात राजकीय उद्दिष्ट ठेवून कामकाज सुरू झाले आहे. पण निवडून आलेले सरकार बहुमताच्या जोरावर चालते. या सभागृहाचा उपयोग करून धमकी देणे योग्य नाही, अशा शब्दांत कौशल्य विकासमंत्री नबाव मलिक यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे सुधीर मुनगंटीवार यांना सुनावले. विधानसभेत आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राष्ट्रपती राजवटीच्या मुद्दय़ावरून जोरदार खडाजंगी झाली.

जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जिल्हाधिकाऱयांकडे यासंबंधी तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलीस कर्मचारी आणि वसतिगृहाबाहेरील काही पुरुष सहभागी असल्याचा आरोप  औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे श्वेता महाले यांनी मांडला होता.

त्यावर बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू आहे, जबाबही नोंदवण्याचे काम सुरू आहे. याची चौकशी झाल्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी संताप व्यक्त केला. सरकार काहीच कारवाई करीत नाही. आमच्या आई-बहिणींची थट्टा होणार असेल तर राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

या वक्तव्यावर कौशल्य विकासमंत्री नबाव मलिक यांनी आक्षेप घेतला. राष्ट्रपती राजवट लावण्याचा अधिकार केंद्राला असू शकतो. जर कायदा व सुव्यवस्था बिघडली आणि सरकार काम करू शकत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली तर राज्यपाल शिफारस करतात. राष्ट्रपती राजवटीची धमकी देणे योग्य नाही, असे भाष्य करणे योग्य नाही. त्यामुळे मुनगंटीवार यांना समज देण्याची मागणी नवाब मलिक यांनी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली. मुनगंटीवर यांचे वक्तव्य सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्याची विनंती केली. त्यावर वाक्य तपासून कामकाजातून काढून टाकण्यात येईल, असे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या