जादा बिले आकारणी खासगी रुग्णालये सील करणार, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर यांचा इशारा

कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांतील अधिकारी-कर्मचाऱयांनी जीव धोक्यात घालून कोरोनाशी लढाई केली; पण अनेक मल्टिस्पेशालिटी व खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून लाखो रुपयांच्या जादा बिलांची आकारणी केली. अशी रुग्णालये सील करण्याचा इशारा आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिला.

मुरगूड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन आणि मुरगूड नगरपालिकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन राज्यमंत्री यड्रावकर – पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार संजय मंडलिक होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, मंडलिक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ऍड. वीरेंद्र मंडलिक, पंचायत समिती सभापती पूनम मगदूम-महाडिक, उपनगराध्यक्षा हेमलता लोकरे, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सुरेश कुराडे, मंडलिक साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन बंडोपंत चौगुले, विजय भोसले, मुख्याधिकारी संजय गायकवाड, नगरसेवक नामदेव मेंडके, जयसिंग भोसले, धनाजी गोधडे, विशाल सूर्यवंशी, मारुती कांबळे, रविराज परीट, राहुल वंडकर, नगरसेविका रेखा मांगले, प्रतिभा सूर्यवंशी, सुप्रिया भाट, संगीता चौगले, वर्षाराणी मेंडके, अनुराधा राऊत, रूपाली सणगर, रंजना मंडलिक आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले, ‘नगर परिषदेच्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी करताना काहीजण तो होऊ नये म्हणून प्रयत्न करतात. इथे मात्र वीरेंद्र मंडलिक यांनी जाहीरनामा पूर्ण करण्याचे काम केले आहे. मुरगूड येथील ग्रामीण रुग्णालयाचा 50 बेडचा प्रस्ताव द्यावा. त्याच्या मंजुरीसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

खासदार संजय मंडलिक म्हणाले, मुरगूड नगरपरिषदेत दिवंगत सदाशिव मंडलिक यांनी अठरा पगड जातीच्या लोकांना पदे देण्याचे काम केले. त्याकाळी एकही निवडणूक मारामारीशिवाय झालेली नाही. संघर्ष करून तालुक्याचा विकास होणार नाही. त्यामुळे आपण समन्वयाची भूमिका घेतली. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे काम करीत आहोत. पुढील निवडणूक सामंजस्यानेच लढवायची आहे. खासदार झाल्यानंतर देशात कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे खासदार निधी गोठवला. आरोग्य राज्यमंत्र्याच्या सोबतीमुळे आरोग्याची गोडी लागली. त्यामुळेच जिह्यातील आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण करता आले.

ऍड. वीरेंद्र मंडलिक यांनी मंडलिक युवा प्रतिष्ठानने शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्याचे शिवधनुष्य लोकवर्गणीच्या बळावर उचलले असून, शहरवासीयांनी भरघोस देणगी देण्याचे आवाहन केले. खासागी रुग्णालयांनी कोरोना महामारीच्या काळात रुग्णांची केलेली आर्थिक लूट ऍड. मंडलिक यांनी आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

आपली प्रतिक्रिया द्या