शिरोळ तालुक्याला आरोग्य सेवेसाठी मंत्री यड्रावकर यांच्या निधीतून 50 लाखांचा निधी

387

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यात आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. संशयित व बाधीत रुग्णांच्या उपचारांसाठी शिरोळ तालुक्यातील शासकीय आरोग्य विभागाला उपकरणे खरेदी करण्यासाठी आपल्या निधीतून 50 लाख रुपये उपलब्ध करुन द्यावेत, अशा सूचना राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जिल्हा नियोजन कार्यालयाला दिल्या आहेत.

याबाबतच्या पत्रकात मंत्री यड्रावकर यांनी म्हटले आहे, की तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला व्हेटीलेंटरसह अनेक उपकरणे पुरवणे गरजेचे आहे. शिरोळ तालुक्यातील प्रमुख शहरे व ग्रामीण भागातील रुग्णांसाठी अलगीकरण कक्ष ठिकठिकाणी तयार केले गेले आहेत. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रांसह कोरोनाचे उपचार करणार्‍या डॅाक्टर्स, नर्सेस व कर्मचार्‍यांना आवश्यक ती उपकरणे देणे गरजेचे आहे. म्हणूनच या निधीची आवश्यकता आहे. या निधीचा विनियोग व्हेंटीलेटर, मॅानिटर, थर्मल स्कॅनर, पी.पी.ई. किट, एन. 95 मास्क, ऑक्सिंजन सिलेंडर व इतर उपकरणे खरेदी करण्यासाठी होणार आहे.

तालुक्यामध्ये एकूण 67 नागरिक परदेश दौर्‍यावरुन आलेले आहेत. या सर्व नागरिकांना होम क्वारंटाईन केले होते. 62 नागरिकांनी क्वारंटाईनचा कार्यकाल पूर्ण केला असून पाचजण अद्याप होम क्वारंटाईन आहेत. तालुक्यात अद्याप एकही संशयित अथवा बाधीत रुग्ण आढळला नसल्याचे यड्रावकर यांनी पत्रकात म्हटले आहे.

शिरोळ तालुक्यात 174 आयसोलेशन बेड्स
दक्षता म्हणून शिरोळ ग्रामीण रुग्णालयात 14, दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात 15, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 28, डॅा. जे. जे. मगदूम आयुर्वेदिक महाविद्यालयात 50, कुरुंदवाडच्या अंकुर व नवजीवन रुग्णालयात 25, जयसिंगपूरच्या मोदी हॅास्पिटल येथे 30 व पायोस हॅास्पिटल येथे 12 अशा 174 आयसोलेशन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. विविध ठिकाणी व्हेंटीलेटर व मॅानीटरची सुविधाही उपलब्ध केली असल्याचे राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या