आश्रमशाळेच्या अनुदानासाठी मंत्री बडोलेंच्या पीएने मागितले 10 लाख

सामना ऑनलाईन । मुंबई

धाराशीवमधील आश्रमशाळा अनुदानित करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या पीएने तब्बल 10 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच कार्यालयातील अधिकाऱ्याने पैसे घेऊनही काम न केल्याने धाराशीवमधील संस्थाचालक अरुण निठुरे यांनी त्याला चोचचोप चोपले. मंत्रालयात मंत्र्यांच्या कार्यालयातच घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

धाराशीव येथील केशेगाव येथे अरुण निठुरे हे 2002 सालापासून आश्रमशाळा चालवतात. ही आश्रमशाळा विनाअनुदानित असल्याने तिला सरकारचे अनुदान मिळावे म्हणून त्यांनी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवल्या. त्यांनी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या कार्यालयात संपर्क साधला. एका अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार त्याला एक लाख 60 हजार रुपयेही दिले. मात्र त्यानंतरही काम न झाल्याने या अधिकाऱ्याला बडोले यांच्याच कार्यालयात गाठले. अधिकाऱ्याने मी तुझा पैशाचाही मिंधा नाही असे सांगताच निठुरे यांनी त्याच्या कानशिलात लगावून त्याला चोपले. शुक्रवारी घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली असून बडोले यांच्या पीएने आपल्याकडे 10 लाख रुपये मागितल्याचा आरोपही निठुरे यांनी केला आहे. दरम्यान, माझ्या स्कीय सहाय्यकाकर केलेले आरोप हे राजकीय षड्यंत्र असून मोघम स्करूपाचे आहेत. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे बडोले म्हणाले.

आज भ्रष्ट पीएला मारहाण, उद्या हीच वेळ मंत्र्यांवरही ओढवेल – विखे-पाटील

आज भ्रष्ट पीएला मारहाण होते, अशीच परिस्थिती राहिल्यास हीच वेळ उद्या मंत्र्यांवरही ओढवू शकते, असा इशारा राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारला दिला. या घटनेवरून घणाघात करताना ते म्हणाले की, या सरकारमध्ये आता लोक मंत्रालयात घुसून मंत्र्यांच्याच दालनात त्यांच्या अधिकाऱयांना मारहाण करू लागले आहेत. या सरकारने पारदर्शक कारभाराचे आश्वासन दिले होते आणि मंत्रालयात नेमका कसा कारभार सुरू आहे, ते आता अगदी ‘पारदर्शक’ पद्धतीने समोर आले आहे.