नगर जिल्ह्यात जनतेचा रोष, भाजप मंत्र्यांनी काढला पळ

26

सामना प्रतिनिधी, नगर

नगर जामखेड येथील राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्येच्या घटनेनंतर पालकमंत्री राम शिंदे हे जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. नगर जिल्ह्याचा बिहार झालाय का ,आरोग्याची सुविधा कोलमडली आहे, अशा शब्दात त्यांना जनतेने सुनावले. जनतेचा रोष पाहता जिल्हा खासगी गाडीतून पालकमंत्र्यांनी तिथून काढता पाय घेतला.

जामखेड येथे शनिवारी सायंकाळच्या सुमारास योगेश राळेभात आणि राकेश राळेभात यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्या दोघांना सुरुवातीला जामखेड रुग्णालयामध्ये नेण्यात आले. पण रुग्णालयात कर्मचारी नसल्याने सगळाच गोंधळ उडाला. अखेरीस त्यांना तात्काळ नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच योगेश यांचा मृत्यू झाला आणि राकेश यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती कळल्यानंतर जिल्ह्याचे पालक मंत्री राम शिंदे यांनी तात्काळ त्यांनी जिल्हा रुग्णालय गाठले. मात्र तेथे माहिती घेत असतानाच संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी शिंदे यांच्यावरच प्रश्नांचा भडिमार केला. जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. नगरचा बिहार झाला आहे का? जामखेडमध्ये रुग्णालयाची अवस्था काय आहे ती पहा, तेथे यांना उपचार मिळाले नाहीत. याला जबाबदार कोण असा सवालही उपस्थित केला. संतप्त झालेल्या नागरिकांनी राम शिंदे यांना चांगलेच धारेवर धरले. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण जनतेचा रोष मोठ्या प्रमाणात असल्यामुळे व कोणीही न ऐकण्याच्या मनस्थितीत असल्याचं पाहत अखेरीस राम शिंदे यांना काढता पाय घ्यावा लागला.

मागच्या दाराने त्यांना एका खासगी गाडीमध्ये बसून ते घराकडे रवाना झाले. जिल्हा रुग्णालयांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रात्रभर या दोघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयांमध्ये ठेवण्यात आले होते. जामखेड इथेही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी केडगाव येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची हत्या झाली होती. त्या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच जामखेड येथे या हत्या झाल्या. या हत्यांच्या निषेधार्थ जामखेड बंदचे आयोजन करण्यात आलं आहे. तसेच दोन्ही मृतदेह आज पहाटेच्या सुमारास पोलीस बंदोबस्तामध्ये शवविच्छेदन करण्यासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये नेण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या