मोदींना मंत्री घाबरतात!; भाजप खासदार नाना पटोले यांची ‘मन की बात’

30

सामना ऑनलाईन । नागपूर

प्रश्न विचारले तर पंतप्रधान खासदारांवर चिडतात, असे सांगतानाच मोदी सरकारमधील मंत्री सदानकदा घाबरलेल्या अवस्थेत दिसतात. त्यांची स्थिती पाहूनच मी मंत्रीपद नकोच म्हणतो, अशा शब्दांत भाजपचे भंडाऱ्याचे खासदार नाना पटोले यांनी आज थेट पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले. अॅग्रोव्हेट आणि अॅग्रो इंजिनीयरिंग मित्र परिवारातर्फे आयोजित ‘विदर्भातील सिंचन सुविधा आणि शेतकऱ्यांचे अश्रू’ या विषयावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अतिथीगृहात एक परिसंवाद पार पडला त्यात ते बोलत होते.

लोकसभा अधिवेशनाआधी पंतप्रधान मोदी हे प्रत्येक प्रदेशातील भाजप खासदारांना बोलावून घेऊन त्यांच्या भागातल्या समस्या जाणून घेत असतात. पण खासदारांना मात्र बोलूच देत नाहीत, असे पटोले यांनी सांगितले. ते म्हणाले की, मोदी हे कुठल्याही प्रश्नाला उत्तर न देता खासदारांनाच प्रश्न विचारत सुटतात. आम्ही प्रश्न विचारले तर तुम्हाला सरकारच्या योजना ठाऊक नाहीत. पक्षाचा जाहीरनामा तुम्ही वाचला नाही, असे विचारून खासदारांना गप्प केले जाते.

निधी मिळवण्याची धमक फडणवीस यांच्यात नाही
केंद्राकडून इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला सगळ्य़ात कमी निधी दिला जातो, असे सांगतानाच आपल्या राज्यासाठी जास्त निधी मिळवण्याची धमक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नाही, असा जोरदार हल्ला नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांवरही केला. मुख्यमंत्री राज्याच्या कोणत्याही प्रांतातला असो, तो मुंबईत गेला की त्याची मानसिकताच बदलते, असे सांगून ते म्हणाले की, संसदेच्या अधिवेशनाआधी मुख्यमंत्री आणि राज्यातील खासदारांची बैठक घेण्याची पद्धतच फडणवीस यांनी मोडीत काढली आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असताना दिल्लीतून पाहिल्यावर महाराष्ट्र भिकारी दिसतो, असा संताप व्यक्त करून पटोले म्हणाले की, इतर राज्यांचे मुख्यमंत्री आणि खासदार केंद्राकडून जादा निधी खेचून घेऊन जातात. ते पाहिल्यावर मला महाराष्ट्र सरकारची किव येते.

ओबीसींसाठी नवे खाते कशाला?
ओबीसी समाजासाठी नवीन खाते, मंत्रालय सुरू करण्यात यावे अशी आग्रही मागणी आपण सतत करत आलो आहोत, पण पंतप्रधान मोदी यांनी आपल्या योजना आधी जाणून घ्या. मग बोला, असे मला सुनावले. तसेच प्रशासनावरचा खर्च कमी करण्यावर आपला भर आहे, मग नवे खाते सुरू करण्याचा आग्रह धरता कशाला, असा सवाल करून मोदींनी मला ‘चूप’ केले, असेही पटोले यांनी उघड केले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने शेती क्षेत्रात भागिदारी वाढवावी, वृक्ष संवर्धनासाठी हरित कर आकारावा हे मुद्दे आपण मोदींना न जुमानता मांडले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या