
चिकनच्या दुकानात काम करणाऱ्या एका अल्पवयीन खाटिकाने झटपट श्रीमंत होण्यासाठी 9 वर्षांच्या मुलाचा बळी दिला. या मुलाच्या शरिराचे त्याने अनेक तुकडे केले आणि नंतर ते फेकून दिले. या मुलाचं शिर सापडल्यानंतर पोलिसांनी 12 दिवसांच्या आत सगळ्या आरोपींना अटक केली आहे. ही घटना दादरा नगर हवेलीत घडली आहे. पोलिसांनी या गुन्ह्याची उकल करण्यासाठी 100 हून अधिक जणांना तपासात सामील करून घेतलं होतं.
गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातल्या वापीमध्ये एका नाल्यामध्ये या मुलाचं शिर सापडलं होतं. 30 डिसेंबरला सयाली गावातील एक मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती. सिल्वासापासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या वापीमध्ये सापडलेलं शिर हे बेपत्ता मुलाचंच असल्याचं कळाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. तपासादरम्यान पोलिसांना कळालं होतं की सयाली गावात काही दिवसांपूर्वी जादू-टोण्यासाठी केल्या जाणाऱ्या विधीप्रमाणे गोष्टी घडल्या होत्या. तपासादरम्यान पोलिसांनी एका अल्पवयीनाला ताब्यात घेतलं होतं. चौकशीदरम्यान त्याने या मुलाचं अपहरण केल्याचं कबूल केलं होतं. या मुलाचं अपहरण केल्यानंतर आपण साथीदाराच्या मदतीने या मुलाचा बळी दिल्याचे या अल्पवयीनाने पोलिसांना सांगितले होते.
अल्पवयीनाच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी त्याचा मित्र शैलेश कोहकेरा याला अटक केली आहे. रमेश सांवर नावाच्या व्यक्तीने अल्पवयीन आरोपी आणि शैलेश यांना बळी दिलात तर तुम्ही श्रीमंत व्हाल असं सांगितलं होतं. पोलिसांनी या रमेश सांवरलाही अटक केली आहे. ताब्यात घेण्यात आलेला अल्पवयीन आरोपी हा चिकनच्या दुकानात खाटिकाचे काम करतो. हा आरोपी मूळचा गुजरातचा रहिवासी असल्याचे कळाले आहे.