आयआयटी शिक्षा अॅकॅडमीत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

1007

शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना सिंहगड रस्ता परिसरातील एका खासगी शिकवणुकीच्या वर्गात घडली. एका शिक्षकाने अल्पवयीन मुलीस तू मला खूप आवडते, असे म्हणत लगट करण्याचा प्रयत्न करीत विनयभंग केला. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी संबंधित शिक्षकास अटक केली आहे.

सूर्यप्रकाश पाटील (रा. उज्ज्वल पॅराडाइज, गणेशनगर, धायरी) असे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. ही घटना नुकतीच आयआयटी शिक्षा अ‍ॅकॅडमीमध्ये घडली. याप्रकरणी एका महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी महिलेची 15 वर्षीय मुलगी आयआयटी शिक्षा क्लासला जात होती. त्या अ‍ॅकॅडमीत सूर्यप्रकाश शिक्षक म्हणून कार्यरत होता. मागील तीन महिन्यांपासून त्या मुलीला त्रास देत तिचा विनयभंग करत होता. दरम्यान, १५ ऑक्टोबरला मुलगी क्लासला गेली असता सूर्यप्रकाशने तिला केबिनमध्ये बोलावून तू मला खूप आवडते, असे म्हणत लगट करण्याचा प्रयत्न करीत विनयभंग केला. त्यानंतर घाबरलेल्या मुलीने घटनेची माहिती आई-वडिलांना दिली. त्यानंतर काही पालकांनी सूर्यप्रकाशला मारहाण केली. महिलेच्या तक्रारीनंतर सिंहगड पोलिसांनी सूर्यप्रकाशविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. सहायक निरीक्षक अर्चना बोदडे तपास करीत आहेत. दरम्यान, याप्रकरणी सूर्यप्रकाशला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

पालकांकडून शिक्षकाची धुलाई

शिक्षक  सूर्यप्रकाशला महिलांनी चोप दिला. संबंधित शिक्षकाने शिक्षा अ‍ॅकॅडमीत अजून काही मुलींचा विनयभंग केल्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सध्या त्या शिक्षकाची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नंदकुमार शेळके यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या