कर्जतमध्ये पावसाचा पहिला बळी, कल्याणच्या अल्पवयीन मुलीचा धबधब्यात पडून मृत्यू

सामना प्रतिनिधी, कर्जत

कर्जत तालुक्यातील वर्षासहलीच्या पर्यटनावर बंदी जाहीर झालेली असताना देखील बंदी झुगारून पर्यटकांचा बेफामपणा सुरूच असल्याचे चित्र आहे. या बेफामपणामुळे नेरळ येथील टपालवाडीच्या धबधब्यावर एका अल्पवयीन मुलीचा अपघात होऊन यात तिला जीव गमवावा लागला आहे.

पाऊस सुरू झाल्यानंतर कर्जत तालुक्यातील धबधबे ओसंडून वाहू लागतात. या धबधब्यांसोबत पर्यटकांचा उत्साह देखील ओसंडून वाहू लागतो. तालुक्यातील धबधबे, धरणे यांसारख्या पाणवठ्याच्या ठिकाणी पर्यटकांची तोबा गर्दी व्हायला सुरुवात होते. मात्र या पर्यटकांमध्ये काही अतिउत्साही, मद्यपी पर्यटकांमुळे वर्षासहलीच्या रंगाचा बेरंग मागील काही वर्षात झालेला आहे. अनेक पर्यटकांना आपले जीव गमवावे लागले होते. त्यामुळे मागील वर्षापासून तालुक्यातील वर्षासहलींवर बंदीचे सावट घोंघावू लागले. या वर्षीही कर्जतच्या उपविभागीय अधिकारी यांनी 5 जुलै पासून तालुक्यात वर्षासहलींवर 13 नियम अटीन्वये बंदी जाहीर केली. मात्र ही बंदी जाहीर केल्याच्या सहाव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सकाळच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीचा धबधब्यावर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

संजना वशिष्ठ शर्मा (वय 17) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव असून ती कल्याण नांदिवली येथे राहणारी होती. नेहमीप्रमाणे ती घरातून कॉलेजला जाण्यासाठी बाहेर पडली. मात्र गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास ती आपल्या मित्रांसह थेट नेरळ येथे दाखल झाली. नेरळ येथून ते टपालवाडीच्या धबधब्यावर ते वर्षासहलीचा आनंद घेण्यासाठी पोहचले. रात्रीपासून पाऊस जोरदार सुरू असल्याने धबधब्याच्या पाण्याचा जोर बराच होता. धबधब्यावर हा आनंद घेत असताना अचानक पाय घसरून संजना खाली घसरत गेली. अचानक कोसळल्यामुळे तिच्या डोक्याला दगडाचा जोरदार फटका बसला त्यामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून अकस्मात मृत्युची नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली आहे.