लातुरात लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीस पळवले

सामना प्रतिनिधी । लातूर

लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीस पळवून नेण्यात आल्याची घटना लातूर शहरात घडली. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील साईरोड भागातील महानंदा राम कोंडामंगले यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. फिर्यादीची मुलगी अल्पवयीन असून तिने 12 वी ची परीक्षा दिली आहे. सुट्टीत शिवणक्लासला जात होती. 22 एप्रील रोजी फिर्यादी व तिचा नवरा हे लग्नासाठी घरातून सकाळी 11 वाजता गेले. सायंकाळी 5 वाजता ते घरी आले त्यावेळी त्यांची मुलगी घरी नव्हती. ती शिवण क्लासला गेली असावी म्हणून त्यांनी लक्ष दिले नाही. परंतु उशीरापर्यंतही ती घरीच आली नाही म्हणून त्यांनी शोधाशोध सुरू केली.

मुलीच्या मैत्रिणींकडे संपर्क साधला, नातेवाईकांकडे चौकशी केली. परंतु मुलगी सापडली नाही. हत्ते नगर येथील मनोज शिंदे हा घरी आला व त्याने सांगितले की, तुमची मुलगी त्याचा भाऊ मंगेश शिंदे याच्यासोबत गेली आहे. दोघांचे लग्न लावून द्या, मात्र आपली मुलगी अल्पवयीन आहे, असे सांगून लग्न करून देणार नाही असे सांगितले असता त्यांनी धमकी दिली. 15 मे रोजी त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुलीस लग्नाचे अमिष दाखवून पळवल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार मंगेश शिंदे याच्याविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रेमी युगलांचा शोध घेण्यात येत आहे.