अल्पवयीन मुलीच्या अपहरणानंतर वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू; तपासाचे पोलिसांचे आश्वासन

अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची तक्रार देऊनही आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून दाद न मिळाल्याने मानसिक तणावातून मुलीच्या वडिलांनी धसका घेतल्याने त्यांचा हृदयविकाराच्या मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मुलीचा शोध लागेपर्यंत तिच्या वडीलांचा मृतदेह ताब्यात घेण्यास संतप्त नातेवाईकांनी नकार दिला. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी 10 दिवसाच्या आत मुलीचा व आरोपीचा शोध लावण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मुलीच्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यास आले. निलेश देशपांडे (वय 45,रा.नारायण पेठ) असे हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

निलेश देशपांडे यांची मुलगी एप्रिल महिण्यात बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीच्या कुटूंबियांनी संशयीत आरोपीची माहिती पोलिसांनी दिली होती. निलेश देशपांडे सातत्याने पोलिसांकडे तपासाबाबत माहिती घेत होते. मात्र, सतत तणावात राहिल्याने देशपांडे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला. त्यानंतर पोलिसांनी संशयीत आरोपीच्या घरच्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या