आष्टीत होणारा बालविवाह रोखण्यास बाल संरक्षण कक्षाला यश

अमरावती जिल्ह्यातील एक बालविवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. बाल कल्याण समिती अकोलामार्फत अकोला येथील एका अल्पवयीन मुलीचा अमरावती जिल्हातील आष्टी गावात बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर त्वरित जिल्हा बाल संरक्षण कक्ष अमरावतीला ही माहिती देण्यात आली. मुलीचे वय निश्चित करण्यात आले आणि गावस्तरीय यंत्रणेला कळविण्यात आले. अमरावती जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे विधि अधिकारी सीमा भाकरे व समुपदेशक आकाश बरवट, पोलीस पाटील, चाईल्ड लाईन यांनी प्रत्यक्ष गावात भेट दिली. सर्वांनी संबधित कुटुंबातील मुलगी 17 वर्षाची आहे. त्यामुळे तिचा होणारा विवाह बेकायदेशिर असल्याचे सांगितले.

बालविवाहाचे दुष्परिणाम व बालविवाह कायद्याबाबत माहिती सांगून त्यामध्ये नमूद असलेल्या शिक्षेची व कार्यवाहीची माहिती मुलीच्या कुटुंबियांना देण्यात आली. बालिकेचे व तिच्या आईचे समुपदेशन करण्यात आले. मुलीच्या आईने नियोजित विवाह मुलगी 18 वर्षांची झाल्यावर करू अशी हमी सर्व पदाधिकारी यांना दिली. आता मुलीच्या लग्नाचा विचार 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर करू असा निर्धार उपस्थितासमोर केला. तसा लेखी जबाबही जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे विधि अधिकारी अजय डबले यांना मुलीच्या पालकांनी व नातेवाईकांनी दिला. ग्रामपंचायत सरपंच,पोलीस पाटील प्रविण प्रधान, नागरिक, चाईल्ड लाईनचे समन्वयक कपूर व टीम मेंबर देशमुख, वलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, एएसआय नरेंद्र मेटकर, भोंगे यावेळी उपस्थित होते.

ही सर्व कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनिल मेसरे व जिल्हा बाल सरक्षण अधिकारी अजय डबले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बाल विवाह प्रतिबंधक कायदा 2006 अन्वये 18 वर्षाच्या आतील मुलीचा विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. जर 18 वर्षाच्या आतील मुलीचा बालविवाह केल्यास अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येते. आपल्या आजूबाजूला असे बालविवाह होत असल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षास द्यावी, असे आवाहन नागरिकांनी करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या