शिक्षणाच्या खर्चाच्या चिंतेतून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

39

सामना प्रतिनिधी । वाशिम

घरच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून वाशिममधील कारंजा तालुक्यातील पोहा येथे पल्लवी तावडे (१६) या अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केली आहे. पल्लवीचे वडील रिक्षा चालवून प्रपंच चालवतात, तर आई मोलमजुरी करून हातभार लावते. घरच्या तुटपुंज्या कमाईमुळे पुढचे शिक्षण कसे होणार? लग्नासाठीदेखील पैसे लागणारच आदी प्रश्नांनी घेरल्या गेलेल्या पल्लवीनं अखेर गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.

पल्लवीच्या कुटुंबात आई-वडील, तीन बहिणी आणि एक भाऊ होते. त्यांच्या शिक्षणाचा खर्च, भविष्यात लग्नासाठी लागणाऱ्या पैशांची जुळवाजुळव करीत असताना आई आणि वडील दोघांचीही दमछाक होत होती. अशा परिस्थितीतही कठीण परिश्रमातून दहावीच्या परीक्षेत ७२ टक्के गुण मिळविले होते. मात्र पुढचे शिक्षण घ्यायचे तर गाव सोडून शहरात जावे लागणार होते. कमीत कमी खर्चात कुठल्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो याची चाचपणी करीत असताना पल्लवीने तीन ते चार महाविद्यालयांचे उंबरठे झिजविले. मात्र ११ वी नंतरचे शिक्षण कमी पैशात कदापी शक्य नसल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे अखेर तिने हलाखीच्या आर्थिक परिस्थितीसमोर गुडघे टेकत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे पोहा गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या