नातीला अश्लील चाळे जबरदस्ती बघायला लावले, मावशीच्या नवऱ्याने बलात्कार केला; चिंचवडमध्ये गुन्हा दाखल

4856

पुण्याजवळच्या चिंचवडमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका मुलीने तिच्या आजी आजोबांविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने तिच्या मावशीच्या नवऱ्याविरोधात बलात्काराचीही तक्रार दाखल केली होती. त्याच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 6 वर्ष आपला छळ करण्यात आल्याचं या मुलीने म्हटलं आहे. हा गुन्हा सोलापुरात घडला असल्याने हे प्रकरण पोलिसांनी माळशिरस तालुक्यातील संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे.

अल्पवयीन मुलगी तिच्या दोन बहिणींसोबत आजी आजोबांसोबत राहायला आली होती. 2014 ते 2020 दरम्यान तिला जे भोगावं लागलं त्याची कल्पनाही करणं कठीण आहे. अन्याय आणि अत्याचाराची परिसीमा झाल्याने तिने मुस्कान नावाच्या स्वयंसेवी संस्थेची मदत घेतली आणि या संस्थेच्या मदतीने गुन्हा नोंदवला. आपल्यासोबत आपल्या दोन बहिणींचाही छळ झाल्याचं या मुलीने म्हटलं आहे.

पीडित मुलीचे आईवडील रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडले होते. त्यानंतर ही मुलगी दोन्ही बहिणींसोबत आजी आजोबांसोबत राहायला लागली होती. पोलिसांत दिलेल्या तक्रारीत पीडित मुलीने म्हटलंय की आजी आजोबा शारिरीक संबंध ठेवत आणि ते तिला जबरदस्ती पाहायला लावत. आजोबांचे वय आता 70 वर्षे असून आजीचे वय 60 वर्ष असल्याचं या मुलीचं म्हणणं आहे. आपण 10 वर्षांची असल्यापासून हे किळसवाणे प्रकार सुरू झाले असंही तिने म्हटलं आहे. आपण हे प्रकार पाहण्यास नकार दिल्यानंतर आजोबा मला मारहाण करायचे असंही तिने म्हटलंय.

पुणे मिरर या वर्तमानपत्राशी बोलताना चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांनी म्हटले की पीडित मुलगी तिच्या बहिणींसोबत चिंचवडमध्ये नातेवाईकांकडे राहायला आली होती. पीडित मुलीने नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर ते प्रचंड हादरले होते. आपण आजी आजोबांकडे परत जाणार नाही, ते चांगले नाहीत असं पीडित मुलीने नातेवाईकांना सांगितलं.

आपल्या नातीचा छळ होतोय, त्रास दिला जातोय हे पीडित मुलीच्या आजीला माहिती होती मात्र तिने याविरोधात काहीही भूमिका घेतली नाही, यामुळे तिच्यावरही गुन्हेगारांना मदत केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने आरोप केला आहे की ती आणि तिच्या बहिणी कपडे बदलत असताना तिचे आजोबा त्याचे चित्रीकरण करायचे. याबाबत कोणाला सांगितलं तर परिणाम वाईट होतील अशी धमकी द्यायचे.   पीडित मुलीने मावशीच्या नवऱ्यावरही गंभीर आरोप केला आहे. आपल्याला गावाला नेऊन तिथे आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने मावशीच्या नवऱ्यावर लावला आहे. यामुळे पोलिसांनी त्याच्याही विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या