रसगुल्ला दिला नाही म्हणून जीवच घेतला, 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू

रसगुल्ला कोणाचा यावरुन दोन राज्यांमध्ये बरेच वर्ष वाद सुरू होता. हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर मिटला. शुभकार्यासाठी रसगुल्ला सारखे गोड पदार्थ हमखास ठेवले जातात. मात्र याच रसगुल्ल्याचा गोडवा एका व्यक्तीच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे. छत्तीसगडमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून रसगुल्ला दिला नाही म्हणून अल्पवयीन मुलाने एका तरुणाचा चाकुने भोसकून खून केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यामध्ये घडली आहे. जेवरा गावामधील सामाजिक हॉलमध्ये लग्नाच्या रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. या रिसेप्शनला आरोपी आपल्या काही मित्रांसोबत आला होता. यावेळी आरोपीने 20 वर्षीय सागर ठाकुरकडे रसगुल्ला मागितला. मात्र त्याने रसगुल्ला दिला नाही. त्यामुळे दोघांमध्ये जोरदार वाद झाला. उपस्थित लोकांनी मध्यस्थी करत वाद मिटवला आणि वातावरण शांत केले.

रिसेप्शन संपल्यानंतर पीडित व्यक्ती आणि आरोपीमध्ये पुन्हा एकदा वाद झाला. यावेळी आरोपीने खिशातील चाकू काढला आणि सागर ठाकुरच्या पोटात खूपसला. त्यानंतर घटनास्थळावरून आरोपी मित्रांसोबत पळून गेला. जखमी सागरला उपस्थित नागरिकांनी तत्काळ जवळील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. सागरचा मृत्यू झाल्यानंतर काही वेळाने आरोपीने पोलीस स्थानकात जाऊन आत्मसमर्पण केले आणि हत्या केल्याची कबुली दिली.