अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, 84 वर्षांच्या वृद्धाची डीएनए चाचणी होणार

1291
प्रातिनिधिक फोटो

एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात 84 वर्षांच्या आरोपीची डीएनए चाचणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या 14 वर्षांच्या मुलीने नुकताच एका मुलीला जन्म दिला आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हे प्रकरण पश्चिम बंगाल येथील सिलिगुडी येथील आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी पीडितेच्या वडिलांना ती गर्भवती असल्याचं आढळलं होतं. त्यानंतर त्यांनी ते राहत असलेल्या 84 वर्षांच्या वृद्ध घरमालकावर पीडितेचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या वृद्ध आरोपीला अटक झाली. 5 जुलै रोजी पीडितेने एका मुलीला जन्म दिला.

आरोपीने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून त्याने दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. आरोपीच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी आणि पीडितेच्या वडिलांमध्ये गेला काही काळ घरावरून वाद सुरू आहेत. पीडितेचं कुटुंब आरोपीच्या घरात भाडेकरू म्हणून राहतं. त्यांनी आपल्या अशिलाला यात नाहक गोवल्याचं सिब्बल यांनी म्हटलं. ते पुढे म्हणाले की, माझे अशील हे मधुमेहग्रस्त असून शारीरिक संबंध त्यांच्यासाठी अशक्यप्राय गोष्ट आहे. पीडितेच्या वडिलांनी घराचं भाडं थकवलं होतं, त्यावरून त्यांच्यात वाद होते. त्यामुळेच माझ्या अशिलाला खोट्या प्रकरणात गोवण्यात येत आहे, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.

या युक्तिवादानंतर आरोपीनेच डीएनए चाचणीची मागणी केली. त्यामुळे न्यायमूर्ती अशोक भूषण, न्या. संजय कौल आणि न्या. एम. आर. शहा यांच्या घटनापीठाने आरोपीची डीएनए चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. डीएनए अहवाल आल्यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होईल, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी तीन आठवड्यांपर्यंत तहकूब केली.

आपली प्रतिक्रिया द्या