बालगुन्हेगाराकडून साडेपाच लाखांचे मोबाईल जप्त

सामना ऑनलाईन, पुणे

शिवाजीनगर पोलिसांनी चोरलेले मोबाईल विकण्याच्या तयारी असलेल्या एका बालगुन्हेगाराला ताब्यात घेतलं आहे. या बालगुन्हेगाराकडून ५,५०,००० रूपये किंमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. मोबाईल शिवाय १५ हजार रूपयांची सोन्याची चेन आणि एक घड्याळ देखील त्याच्याकडून जप्त करण्यात आलं आहे.

ज्या घरांचे दरवाजे उघडे असत त्या घरामध्ये घुसून हा बालगुन्हेगार मोबाईल चोरत असे . हे चोरलेले मोबाईल विकण्यासाठी सॅकमध्ये भरून तो शिवाजीनगर बस स्टँडवर आला असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. हे मोबाईल तुझ्याकडे कुठून आले असा प्रश्न विचारला असता या बालगुन्हेगाराला त्याची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. या आधी ऑक्टोबर २०१६मध्ये देखील पोलिसांनी या बालगुन्हेगाराला चोरीचे मोबाईल विकताना ताब्यात घेतलं होतं. मात्र त्यानंतरही त्याने मोबाईल चोरीचं काम सुरूच ठेवलं होतं.