मदरशामध्येच झाला होता मुलीवर बलात्कार, तपासात उघड

57

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कठुआ, उन्नाव व गुजरातमधील सामूहिक बलात्कार व हत्यांच्या घटनांवर देशभरात संताप व्यक्त होत असतानाच उत्तर प्रदेशात काही दिवसांपूर्वी बेपत्ता असलेली एक १० वर्षीय मुलगी मदरशाबाहेर बेशुद्धावस्थेत आढळली होती. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता आता नवी माहिती समोर आली आहे. मदरशामध्येच मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती दिल्ली गुन्हे अन्वेषण विभागाने याप्रकरणी केलेल्या तपासात समोर आली आहे.

गुन्हे अन्वेषण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीला २१ एप्रिल रोजी दुपारी काही तरी बहाणा करून टेम्पोच्या मदतीने मदरशामध्ये आणले. त्यानंतर काही वेळ तिला तिथेच दुसऱ्या मजल्यावर लपवून ठेवण्यात आलं. तसेच आरडाओरडा केला तर मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करण्यात आला. बलात्कारानंतर २२ एप्रिल रोजी रात्री दहा वाजता तिला मदरशातून बाहेर सोडण्यात आलं. मात्र त्यावेळी मुलीची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. याप्रकरणी मौलवी गुलाम शाहिदकडे चौकशी केली असता त्याने मुलीला जवळपास २० तास केवळ एक बिस्किटचा पुडा आणि पाणी देऊन मदरशात ठेवण्यात आल्याची माहिती दिली.

मौलवींना या संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती असतानाही त्यांनी कोणालाही याबाबत सांगितले नाही. तसेच मदरशातील अन्य मुलांनाही या घटनेची माहिती होती. मात्र मुलांनी कोणालाही काही सांगू नये म्हणून आरोपींना त्यांना मारहाण केली. दिल्ली गुन्हे अन्वेषण विभागाने मौलवींकडे याप्रकरणी अधिक चौकशी केली असता ही माहिती समोर आली आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या