मीरा-भाईंदर मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण, खासगी लॅबने दिला रिपोर्ट

2142

मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात आजवर कोव्हीड 19 (कोरोना) संसर्ग झालेला एकही रुग्ण नव्हता. मात्र एका खासगी लॅबने मीरा रोड परिसरातील एकाला याचा संसर्ग झाल्याचा रिपोर्ट दिला आहे. पालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन त्याची कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये टेस्ट केलेली आहे. तेथूनच रिपोर्ट आल्यावर सदर व्यक्ती कोरोना बाधित आहे का याचा खुलासा होणार आहे. आणि तसे झाले तर ही व्यक्ती येथील पहिली कोरोना बाधित ठरणार आहे.

पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे मीरा-भाईंदर शहरात कोरोनाचा शिरकाव होउ नये यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. याकामी लागणारी सर्व प्रकारची यंत्रणा त्यांनी तत्काळ सुरू केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 29 मार्च मार्च रोजी परदेशातून येथे आलेल्या एकूण 620 जणांची ओळख पटवली आहे. यातील 227 जणांनी आपला चौदा दिवसांचा क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. तर 393लोक आजमितीस निरीक्षणाखाली आहेत. यातील 357 होम क्वॉरंटाईन तर 36 जण भाईंदर पूर्व गोल्डन नेस्ट येथील क्वॉरंटाईन सेल मध्ये आहेत. विलगीकरण कक्षात एकही नविन व्यक्ती नाही. एकूण 16 जणांचे रिपोर्ट कस्तुरबा येथे पाठविण्यात आले आहेत. यातील 15 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत, तर खाजगी लॅबने दिलेल्या रुग्णाच्या रिपोर्टची प्रतिक्षा पालिकेला आहे.

दरम्यान पालिका प्रशासनाने ही व्यक्ती जेथे रहात आहे, ती इमारत सील केली आहे. तसेच त्याच्या घरातील अन्य चार लोकांना रिपोर्टसाठी कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये पाठवले आहे. त्याशिवाय संपूर्ण परिसराचे सॅनिटायझेशन केले आहे. यावेळी लोकांनी घाबरून जाउ नये मात्र कारण नसताना घरातून बाहेर पडू नये असे आवाहन डांगे यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या